Human Life: माणसाचं आयुष्य कसं वाढवता येईल यावर जगभरातील शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. अनेक तज्ञांनी अमरत्वाबद्दल बोललं आहे. अमरत्वाचं सूत्र अद्याप शास्त्रज्ञांना सापडलं नसलं तरी दीर्घायुष्य (Longer Life) मिळवण्याचा एक सोपा आणि सुंदर मार्ग शास्त्रज्ञांनी शोधला आहे. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या अलीकडील संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या लोकांमध्ये अनेक जैविक आणि आण्विक बदल होतात, ज्यामुळे त्यांचं वय वाढतं. या अभ्यासाचा निष्कर्ष 'साइंटिफिक अ‍ॅडव्हान्सेस' या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.


जैविक वय आणि कालक्रमानुसार वय


एखाद्या व्यक्तीचं जैविक वय तो कोणत्या प्रकारच्या जीवनशैलीचा (Lifestyle) अवलंब करतो यावर अवलंबून असतं. त्यामुळे जैविक वय वाढू किंवा कमी होऊ शकते. जर जैविक वय हे कालक्रमानुसार वयापेक्षा कमी असेल तर लोक लवकर वृद्ध होतात. म्हातारपणात होणारे सर्व रोग त्यांच्यावर आधीच परिणाम करतात आणि मृत्यूची शक्यता देखील वाढते.


निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने वय वाढतं


शास्त्रज्ञांच्या शोधात असं समोर आलं आहे की, निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्यांनी दीर्घायुष्य लाभतं. आयुष्य वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या खाण्याचा सल्लाही शास्त्रज्ञ देतात, तर व्यायाम करण्यालाही प्राधान्य देण्याचा सल्ला ते देतात. हिरव्यागार परिसरात राहिल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो आणि आरोग्य निरोगी राहते. उत्तम आरोग्य लाभल्याने माणसाचे आयुष्य वाढते.


900 लोकांवर जवळपास 20 वर्ष संशोधन


शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी अमेरिकेतील 4 शहरांची निवड केली होती, जिथे दोन वेगवेगळ्या वातावरणात राहणाऱ्या लोकांचा समावेश करण्यात आला. सुमारे 900 लोकांवर दोन दशकं हे संशोधन करण्यात आलं. हरित वातावरणाचा आरोग्यावर काय परिणाम होतो, हे शोधणं या संशोधनामागचा उद्देश होता.


निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने किती वर्ष वाढतं वय?


संबंधित व्यक्तींच्या डीएनएची तपासणी करून संशोधन पथकाने मेथिलेशन नावाचा रासायनिक बदल पाहिला. ही प्रक्रिया सामान्यतः डीएनएमध्ये घडते, परंतु जसजसे आपले वय वाढते तसतसे त्यात बदल दिसून येतात, याला एपिजेनेटिक क्लॉक असंही म्हटलं जातं. तर, शास्त्रज्ञांना संशोधनात असं दिसून आलं की, जे लोक निसर्गाच्या सान्निध्यात, हिरव्यागार परिसरात राहत होते, ते अधिक तरुण होते. बाकीच्यांच्या तुलनेत त्यांचं वय अडीच वर्षं कमी वाटत होतं. शास्त्रज्ञ अजूनही यावर अधिक व्यापक संशोधन करत आहेत.


हेही वाचा: