Guru Purnima 2023 : आज राज्यात गुरुपौर्णिमा साजरी केली जातेय. या निमित्ताने आज विठ्ठल मंदिरात संत-देव भेटीचा अनुपम्य सोहळा पार पडला. आज सर्व नऊ मानाच्या पालख्यांनी विठ्ठल मंदिरात येऊन विठुरायाच्या चरणांचे दर्शन घेतले आणि पालखीने परतीसाठी प्रस्थान केले. 


आषाढी यात्रेसाठी शेकडो मैलांचे अंतर चालत आलेल्या पालखी सोहळ्यातील पादुकांची आज देवाच्या चरणांशी भेट झाली. देव आणि संत भेटीचा हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी पालखी सोहळ्यातील शेकडो भाविकांनी आज मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आषाढीसाठी आलेल्या संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत एकनाथ या सातही पालखी सोहळ्यांना वारकरी संप्रदायात मानाच्या पालख्या म्हणून ओळखल्या जातात. याशिवाय शासनाने संत निळोबाराय आणि रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्यालाही मानाचा पालखी सोहळा घोषित केल्याने आता नऊ मानाच्या पालख्या झाल्या आहेत. 


संत - देव भेटीचा अद्भुत सोहळा 


वारकऱ्यांनी गोपाळकाल्याचा आनंद लुटायला या सर्व संत पालख्या वर्षात फक्त एकदाच आषाढ पोर्णिमेला विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. वारकरी संप्रदायात या संत - देव भेटीला फार महत्व असते. ज्या संतांचा जयजयकार संप्रदाय आयुष्यभर करीत असतो त्या संतांची आज आपल्या लाडक्या विठुरायाशी भेट होत असते. आज भल्या पहाटे सर्व पालखी सोहळे चंद्रभागा स्नान करुन गोपालपूरला गोपाळकाल्यासाठी रवाना झाल्या. 'गोपाळकाला गोड झाला गोविंदाने गोडं केला' म्हणत हजारो वारकऱ्यांनी गोपाळकाल्याचा आनंद लुटला. यानंतर हे सोहळे देवाच्या भेटीसाठी मंदिरात दाखल होऊ लागले. गोपाळकाल्यानंतर एक एक मानाचे पालखी सोहळे देवाच्या भेटीसाठी मंदिरात येऊ लागले. या पालखी सोहळ्याबरोबर संपूर्ण पालखी मार्ग पायी चालत आलेले वारकरी आणि मानकरी आपल्या पालखी सोहळ्याबरोबर मंदिरात येत होते. सुरुवातीला या मानकऱ्यांचा दर्शन झाल्यावर पालखी सभा मंडपात ठेऊन येथे मंदिर समितीच्या वतीने या संतांच्या पादुकांचे दर्शन आणि मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 


विठ्ठल सभामंडपात हरिनामाच्या जयघोषात या पादुकांना देवाच्या भेटीसाठी गाभाऱ्यात आणण्यात आले. येथे संतांच्या पादुका देवाच्या पायाजवळ ठेवत देवाची आणि संतांच्या भेटीचा अनुपम्य सोहळा संपन्न झाला. मंदिराच्या वतीने गाभाऱ्यात प्रत्येक संतांच्या पादुका घेऊन आलेल्या मानकऱ्यांना उपरणे आणि मानाचा नारळ भेट म्हणून देण्यात आला. यानंतर हे सर्व पालखी सोहळे आपल्या मठात पोहोचले. यानंतर दुपारी सर्वच पालखी सोहळ्यांनी क्रमाक्रमाप्रमाणे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आषाढी सोहळ्यासाठी लाखोंचा जनसागर घेऊन आलेल्या या सर्वच पालखी सोहळ्याबरोबर जाताना मात्र मोजकेच मानकरी आणि वारकरी परतीच्या पायी प्रवासात सामील झाले होते.