Lakshmi Pujan 2020 : लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? कसं करावं लक्ष्मीपूजन?
दिव्यांचा सण म्हणून ओळख असणाऱ्या दीपावलीचा आज पहिला दिवस. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकत्रितपणे साजरी केली जाणार आहे. परंतु, यंदा कोविड-19 संकटामुळे सण साजरा करण्यावर काही बंधनं आली आहेत.
Lakshmi Pujan 2020 : हिंदू सणांमध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रीनंतर सर्वात मोठा सण येते तो म्हणजे दिवाळी. दिवाळीची सुरूवात वसुबारस पासून होते. त्यानंतर धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे सण दिवाळीमध्ये साजरे केले जातात. यावेळी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. तर पाडवा आणि भाऊबीज देखील एकाच दिवशी आले आहे. दिव्यांचा सण म्हणून ओळख असणाऱ्या दीपावलीचा आज पहिलाच दिवस. सर्वत्र दिव्यांची आरास, घरापुढे रांगोळी, दरवाज्याला तोरण लावून दिवाळी पहाटची सुरुवात होते.
यंदा दिवाळीचा सण आणि लक्ष्मी पूजन एकत्रितपणे साजरी केली जाणार आहे. लक्ष्मी पूजनावेळी देवी लक्ष्मी, कुबेर आणि गणेशाची पूजा केली जाते. तसेच घरात सुखशांती, समृद्धी कायम रहावी यासाठी प्रार्थना ही केली जाते. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीला फराळाचा आणि लाह्या-बत्तास्यांचा नैवेद्य दाखवला जातो.
आजच्या दिवशी घराबाहेर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात. त्यावर दिव्यांची आरास केली जाते. कंदील, विद्युत रोषणाई यामुळे सारा परिसर प्रकाशमय होतो. फटाक्यांची आतिषबाजी होते. मिठाई, फराळ यांची मेजवानी असते. सगळीकडे उत्सहाचं वातावरण असतं. परंतु, यंदा कोविड-19 संकटामुळे सण साजरा करण्यावर काही बंधनं आली आहेत.
लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त
दर्श अमावस्या, महालक्ष्मी कुबेरपूजन आश्विन कृष्णपक्ष, शनिवार दि. 14 नोव्हेंबर 2020 दुपारी 2.18 पर्यंत चतुर्दशीनंतर अमावस्या आहे.
शुभ मुहूर्त : संध्याकाळी 5.28 ते 7.30 पर्यंत .
कसं कराल लक्ष्मीपूजन :
दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करतानाप प्रथमत: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जुन लावावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे, असे सांगितले जाते. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सुख, समृद्धीत वृद्धी होते, असे सांगितले जाते.
लक्ष्मीपूजन ज्याठिकाणी करावयाचे आहे तिथे पूजेच्या स्थानी नवग्रह यंत्र ठेवा. त्यावर सोन्याचं किंवा चांदीचं नाणे ठेवा. हे उपलब्ध नसल्यास आपण काही नाणी किंवा पैसे देखील ठेऊ शकता. त्यानंतर गणपती आणि लक्ष्मी मातेच्या दोन्ही मूर्तींना स्नान घालून स्वच्छ धुवून-पुसून विराजमान कराव्यात. तसेच त्या फुलांनी देखील सजवाव्यात. त्यानंतर मूर्तीच्या उजव्या बाजूला तुपाचा किंवा तेलाचा पंचमुखी दिवा लावून पूजा संपन्न करावी.