Salt : तुम्ही जर आहारात मिठाचा अतिरिक्त वापर करत असाल, तर सावधान. कारण अतिरिक्त मिठामुळे तुमच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात. हल्ली अनेकांना उच्चरक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. मात्र त्याचं कारणच मीठ असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मिठाच्या अधिकच्या वापराने उच्चरक्तदाब होतोच, शिवाय त्यामुळे हृदयरोगाचं प्रमाणही वाढलं आहे.
शरीरात किती प्रमाणात मीठ असावं?
तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारातून केवळ 5 ते 6 ग्रॅम मीठ शरीरात जाणं आवश्यक आहे. मात्र सध्या यापेक्षा दुप्पट-तिप्पट प्रमाणात मीठ शरीरात जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच उच्चरक्तदाबाचं प्रमाण वाढलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे, शहरी भागात 30 ते 40 टक्के तर ग्रामीण भागात 12 ते 17 टक्के रुग्णांना उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत आहे. उच्चरक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू, स्मृतीभ्रंश, दृष्टी जाण्याची भीती अशा समस्या उद्भवू शकतात.
अमेरिकेत मीठ कमी वापरण्यासाठी मिठाच्या अतिरिक्त वापराच्या दुष्परिणामांमुळे अमेरिकेने तातडीने हालचालींना सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये खाद्य पदार्थांत मीठ कमी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमेरिकेत दररोज सुमारे 3,400 मिलीग्रॅम मिठाचा वापर होतो. मात्र एफडीएने पुढील दोन वर्षात हे प्रमाण 3000 मिलीग्रॅम आणि पुढील 10 वर्षात 2,300 मिलीग्रॅमपर्यंत आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
कोणासाठी किती मीठ गरजेचं?
- जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार प्रौढ वयोगटातील व्यक्तींनी एका दिवसाला 5 ग्रॅमहूनही कमी (एका टीस्पूनपेक्षाही कमी) मीठाचं सेवन केलं पाहिजे.
- 15 वर्षांखालील बालकांनी प्रौढ वयोगटाहूनही कमी प्रमाणात मीठाचं सेवन करावं. (या वयोगटात 0 ते 6 महिने वयोगटातील स्तनपान घेणाऱ्या बालकांचा समावेश नाही).
- सेवन केलं जाणारं मीठ आयोडिनयुक्त असावं. याची मदत मेंदूच्या वाढीसाठी होते.
सोडियम हा घटक शरीरातील प्लाझ्माचं प्रमाण, अॅसिड बेस आणि शरीरारील नसांसाठी महत्त्वाचा असतो. पण, त्याचं अती सेवनही धोक्याचं असतं. ज्यामुळे याचे थेट परिणाम रक्तदाबावर दिसून येतात.
दैनंदिन जीवनात मीठाचं प्रमाण कमी कसं करावं?
- रोजच्या जेवणाची तयारी करताना त्यामध्ये मीठ घालणं टाळा
- जेवणाच्या टेबलावर किंवा पानात जास्तीचं मीठ ठेवू नका
- मीठाचा जास्त वापर असणाऱ्या पदार्थांचं सेवन टाळा
- सोडियमचं प्रमाण कमी असणाऱ्या पदार्थांना प्राधान्य द्या
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : विड्याच्या पानाचे आरोग्यदायी आणि सौंदर्यदायी फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या...
- Health Benefits Of Kiwi : रोज किवी खा, विटामिन सीची कमतरता दूर करा
- Covid19 : कोरोनाचा डोळ्यांवर परिणाम; 90 टक्के लोकांच्या दृष्यमानतेत फरक झाल्याचा दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha