Blog : 'यह जमी यह आसमाँ..हमारा कल हमारा आज...बुलंद भारत की बुलंद तसवीर..हमारा बजाज..हमारा बजाज'. ही जाहिरात आजही तुमच्या आमच्या मनात घर करुन आहे.
1990 च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा टीव्ही हे दृकश्राव्य माध्यम गियर टाकत होतं. त्या टीव्हीवरुनच ही जाहिरात घराघरात पोहोचली आणि त्याचसोबत ही धून मनामनात फेर धरु लागली, या स्कूटरची विक्रीनेही जणू फेरारीचा वेग पकडला.
जाहिरात बारकाईने पाहिली तर त्यात भारताची विविधतेतील एकता अतिशय ओघवत्या शैलीत दाखवण्यात आल्याचं तुम्हाला दिसून येईल. मला तर ही जाहिरात पाहून 'मिले सूर मेरा तुम्हारा..' हे गीत आठवलं. हे गीत जितक्या सहजतेने तुम्हा आम्हाला एकतेचा मंत्र देऊन जातं. तितक्याच प्रवाही पद्धतीने ही जाहिरात भारताची विविधता उलगडत जाते. अवघ्या 40 सेकंदांमध्ये ही जाहिरात आपल्या मनाचा ठाव घेते. अगदी 30 वर्षांनंतर आजही.
ज्येष्ठ गायक विनय मांडकेंनी हे गीत गायलंय. या जाहिरातीबद्दल बोलताना ते त्या काळात हरवून गेले. ते म्हणाले, साधारण 1988-89 चा तो काळ असेल, मी या क्षेत्रामध्ये नवीन होतो. तेव्हा जगजित सिंग, कृष्णा कल्लेंसारखी दिग्गज मंडळी जिंगल्स गात असत. मी गायक होण्यामागे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कींचा मोठा वाटा आहे, हे मी इकडे आवर्जून नमूद करतो. सुमारे 7000 जिंगल्स मी गायलोय. फिल्म गायनाबद्दल सांगायचं झालं तर मराठी, हिंदी, गुजराती, दाक्षिणात्य अशा सुमारे 100 सिनेमांमध्ये मी गायन केलंय. या जाहिरातीच्या निर्मितीची कहाणी तुम्हाला सांगतो, शुमांत्रो घोषाल नावाचे त्या काळचे मोठे फिल्म मेकर, त्यांनी साकारलेली ही जाहिरात. घोषाल यांना पिक्चरायझेशनची जबरदस्त जाण. त्यांना म्युझिकचाही अप्रतिम सेन्स. लुई बँक्सदेखील मोठे संगीतकार. या टीमसोबत ही जाहिरात करतानाचा अनुभव अविस्मरणीय आहे. योगायोग पाहा, या जाहिरातीचं गाण रेकॉर्ड करायला जातानाही मी बजाजचीच स्कूटर घेऊन गेलो. या रेकॉर्डिंगला म्युझिकमधील दिग्गज तेव्हा उपस्थित होते. ज्यात मनोहारी सिंग, राजेश सिंग अशी ग्रेट मंडळी होती. केंकरे नावाचे रेकॉर्डिस्ट होते. हा अनुभव माझ्या स्वरप्रवासात खूप काही देऊन जाणारा ठरला. जाहिरात विश्वाच्याही कक्षा या जाहिरातीने रुंदावल्या, असंही माझं निरीक्षण आहे, असं सांगताना एबीपी माझासाठी विनय मांडकेंनी ही धून खास पेश केली.
(हमारा बजाज या जाहिरात गीताचे गायक विनय मांडके)
त्या काळी 'हमारा बजाज' अशी टॅगलाईन असणारी ही स्कूटर फक्त ती चालवणाऱ्याची नव्हे तर अवघ्या कुटुंबाची झाली. तिने अवघ्या कुटुंबाला साद घातली. वस्तू असो की, माणूस.. तुमचा जीव त्यामध्ये गुंतला की, ते नातं आणखी घट्ट होतं. तसंच या 'बजाज स्कूटर'चं झालं.
यातले 'हमारा कल...हमारा आज' हे शब्द दोन काळांना, दोन पिढ्यांना जोडणारा सेतू ठरले. तसंच या 'हमारा बजाज' गीताने भारतातील तत्कालिन एकत्र कुटुंब पद्धतीला, सामाजिक जीवनशैलीला अधोरेखित केलं. बजाज स्कूटर मध्यमवर्गीयांच्या जगण्याचा भाग होऊ शकते, हे कंपनीने अगदी सहज जनमानसात बिंबवलं.
या जाहिरातीने नुसता स्कूटरचा खप वाढवला असं नाही, तर ही जाहिरात पै न पै गोळा करुन जगण्याचा संघर्षमय प्रवास कऱणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबाचं फॅमिली साँग झाली. बच्चे कंपनीची चौपाटी किंवा गार्डनची सैर असो, गृहिणींसाठी भाजी मार्केटला जाणं असो, नोकरदार वर्गासाठी ऑफिसला जाण्याकरताचं वाहन किंवा मग निवृत्त मंडळींना आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी हक्काची रपेट करणं असो, या सर्वांसाठी ही बजाजची स्कूटर सेवेला सज्ज आहे, हे या जाहिरातीने मनामनात रुजवलं, बिंबवलं. यामुळेच बजाजची स्कूटर ही फक्त वैयक्तिक वाहन न राहता कौटुंबिक धाग्याने जोडली गेली.
राहुल बजाज यांच्या निधनानिमित्ताने ही जाहिरात पुन्हा एकदा चर्चेत आली..अन् प्रत्येक जणाच्या ओठी हे गाणं पुन्हा आलं. ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचा जीवनप्रवास आज जरी थांबला असला तरी त्यांनी बीजं रोवलेल्या बजाज स्कूटरचा प्रवास आता ई-स्कूटरपर्यंत येऊन पोहोचलाय, पुढेही तो होत राहील. भारताच्या ई-वाहनांमधील प्रगतीचं एक चाक या ई-स्कूटरचंही आहे. राहुल बजाज यांच्या योगदानाला आपण यानिमित्ताने मानाचा मुजरा करुया. 'हमारा बजाज' हा फक्त ब्रँड नाहीये, किंवा वाहन नाहीये तर, एकजुटीची अखंड भावना पुढे घेऊन जाणारी, विविधतेतील एकतेची संस्कृती जोपासणारी ती वाहक आहे आणि राहील.