World AIDS Vaccine Day 2024 : एच आय व्ही एड्स हा एक असा आजार आहे, ज्यावर अद्याप कोणताही इलाज सापडलेला नाही. एड्स हा एक गंभीर आजार असून तो प्राणघातक ठरू शकतो. मात्र, समाजात आजही याबाबत जागृतीचा अभाव आहे. हा ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) मुळे होणारा आजार आहे. ज्यावर कोणताही इलाज नाही. या आजाराचे महत्त्व आणि त्यावरील लस अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 18 मे रोजी जागतिक एड्स लस दिन साजरा केला जातो
आजही समाजात याबाबत जागृतीचा अभाव
जागतिक एड्स लस दिन दरवर्षी 18 मे रोजी आजाराविषयी जागरूकता पसरविण्याच्या उद्देशाने आणि त्याची लस विकसित करण्याचे महत्त्व लक्षात घेऊन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज या लेखात आपण या खास दिवसाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत. एड्स म्हणजे काय आणि त्याची कारणे काय आहेत हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात...
जागतिक एड्स लस दिनाचा इतिहास
या दिवसाचा इतिहास सांगायचा म्हणजे, हा दिवस NIAID द्वारे 1998 साली सुरू करण्यात आला. युनायटेड स्टेट्सचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी एचआयव्ही लस विकसित करण्याच्या आवाहन केले होते. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 1997 मध्ये मॉर्गन स्टेट युनिव्हर्सिटीमधील त्यांच्या भाषणात एड्सची लस विकसित करण्याची गरज अधोरेखित झाली.
जागतिक एड्स लस दिनाचे महत्त्व
जागतिक एड्स लस दिन ही एचआयव्ही लस आणि त्यावरील संशोधनाची गरज अधोरेखित करतो. या दिवशी, जगभरातील लोक एड्समुळे आपला जीव गमावलेल्या लाखो लोकांना श्रद्धांजली वाहतात. जागतिक एड्स लस दिन HIV/AIDS बद्दल गैरसमज दूर करण्याची संधी देणारा दिवस आहे.
एड्स म्हणजे काय?
एड्स, ज्याला एक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम (AIDS) म्हणूनही ओळखले जाते, ही ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) मुळे उद्भवणारी गंभीर स्थिती आहे. हा विषाणू शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो आणि CD4 पेशींना लक्ष्य करतो, जे संक्रमण आणि रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असतात. जेव्हा एचआयव्ही बाधित व्यक्तीची प्रतिकारशक्ती अचानकपणे कमकुवत होते तेव्हा एड्सचे निदान केले जाते. योग्य वेळी उपचार न केल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
एड्सची लक्षणे
एड्सच्या लक्षणांमध्ये ताप, सांधेदुखी, थंडी वाजून येणे, स्नायू दुखणे, घसा खवखवणे, ग्रंथी सुजणे, घाम येणे (विशेषतः रात्री), शरीरावर पुरळ येणे आणि थकवा येणे यांचा समावेश आहे.
एड्सचा प्रसार कसा होतो?
एचआयव्हीचा प्रसार हा प्रामुख्याने रक्त, वीर्य, योनीतून स्त्राव, एनल फ्लूइड आणि आईच्या दुधाद्वारे होऊ शकतो. हा विषाणू असुरक्षित संभोगातून आणि एचआयव्ही संक्रमित रक्ताने दूषित झालेल्या सुया किंवा सिरिंज शेअर करून पसरू शकतो. गर्भधारणेदरम्यान, प्रसूतीदरम्यान किंवा स्तनपान करताना एचआयव्ही बाधित मातेकडून तिच्या मुलापर्यंत हा आजार पसरू शकतो
हेही वाचा>>>
Women Health : महिलांनो टेन्शन कमी घ्या.. सतत तणावाखाली राहिल्यास पोट वाढते, कसे कमी कराल? जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )