Women Health Tips : सध्याच्या काळात कर्करोगाच्या (Cancer) आजाराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय. महिलांमध्ये (Women) तर गर्भाशय मुखाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, एंडोमेट्रियल, वल्वर यांसारख्या कर्करोगाचं प्रमाण वाढत चाललं आहे. यावर वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. जर वेळीच उपचार घेतले नाहीत तर या आजाराचं प्रमाण वाढत जातं.
या संदर्भात बोलताना (प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, लॅपरोस्कोपिक सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) डॉ. रोहिणी खेरा भट्ट म्हणतात की, "स्त्रीच्या गर्भाशयात पेशींची असामान्य वाढ होते तेव्हा गर्भाशयाचा कर्करोग होतो. यापैकी काही कर्करोग अनुवंशिकरित्या आढळून येतात. स्तन, एंडोमेट्रियल तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनी वेळोवेळी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो. "
महिलांच्या कर्करोगाचे प्रकार किती आणि कोणते?
स्त्रीरोगविषयक कर्करोग हा स्त्रीची प्रजनन प्रणाली आणि जननेंद्रियांमध्ये विकसित होतो. यामध्ये योनी, गर्भाशय मुख, गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा समावेश असतो. वाढत्या वयानुसार स्त्रीरोग कर्करोगाची शक्यता वाढते. स्त्रीरोगविषयक कर्करोगाचे विविध प्रकार आहेत ज्याबद्दल महिलांनी सतर्क राहणं आवश्यक आहे.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग : गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे उद्भवणारा कर्करोग आहे. कर्करोग प्राथमिक अवस्थेत शोधण्यासाठी स्क्रीनिंग पद्धती उपलब्ध आहेत. या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी लस देखील उपलब्ध आहे ज्यामुळे या कर्करोगापासून संरक्षण मिळते.
एंडोमेट्रियल : एंडोमेट्रियल लेयरमध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ झाल्यास एंडोमेट्रियल कर्करोग होतो. जेव्हा महिला अधिक रक्तस्त्रावाची तक्रार करतात तेव्हा काहीवेळा हे प्रीकॅन्सरचे लक्षण असू शकते. रजोनिवृत्तीनंतर होणारा कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव धोक्याची घंटा देतो. हा गर्भाशयाच्या अस्तरात विकसित होतो असून बहुतेकदा स्त्रियांना त्यांच्या रजोनिवृत्तीनंतरच्या या काळात याचे निदान होते.
वल्व्हर कर्करोग : वल्वर कर्करोग हा जननेंद्रियावर परिणाम करतो, विशेषत: वाढत्या वयात हा कर्करोग पाहायला मिळतो. तुम्हाला सतत खाज येत असल्यास किंवा खाली त्वचेवर कोणतेही नवीन बदल दिसल्यास वैद्यकीय मदत घ्यायला विसरु नका.
25-45 वयोगटातील महिलांमध्ये वाढते कर्करोगाचे प्रमाण ही एक चिंताजनक बाब ठरतेय. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे सर्व वयोगटातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येते. यामध्ये तुमचं राहणीमान, तुमचा आहार, जीवनशैली या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच पण त्याचबरोबर आनुवंशिकता, लठ्ठपणा, धूम्रपान आणि वाढते वय हे देखील यामागचं मुख्य कारण आहे. यामध्ये महिलांना कर्करोगाची लक्षणे आणि नियमित तपासणी बाबत माहिती देणे, जनजागृती करणे हे वेळीच निदान आणि उपचारासाठी फायदेशीर ठरते असे डॉ. तेजल गोरासिया ( ब्रेस्ट अँड गायनॅक ऑन्को सर्जन, ओन्को लाईफ कॅन्सर सेंटर, चिपळूण) सांगतात.
'अशा' प्रकारे कर्करोग टाळता येऊ शकतो
25-55 वयोगटातील महिलांमध्ये स्त्रीरोगविषयक कर्करोगाचे वेळेवर निदान, उपचार आणि प्रतिबंध गरजेचे आहे. कर्करोग हे स्त्रियांच्या प्रजनन प्रणालीवर देखील परिणाम करतात. पॅप स्मीअर आणि पेल्विक एक्झामिनेशन यासारख्या चाचण्यांमुळे वेळीच कर्करोगाचे निदान शक्य होते. ज्यामुळे कर्करोगांवर यशस्वी उपचार करता येणे शक्य आहे. कर्करोगाच्या प्रकारानुसार त्यावर उपचार केले जातात. प्रत्येक रुग्णासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी तयार केल्या जाऊ शकतात. नियमित व्यायामासह निरोगी जीवनशैली बाळगणे, फळे आणि भाज्यांनी युक्त संतुलित आहाराचे सेवन करणे, अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे आणि तंबाखूजन्य पदार्थ टाळणे यामुळे या प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो असे डॉ. सुंदरम पिल्लई (सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, झायनोवा शाल्बी हॉस्पिटल यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या :