Women's Day 2024: रंग आणि त्यांचं महत्त्व आपण सारेच जाणतो. प्रत्येक रंगाची वेगळी अशी ओळख आहे. काही रंगांची वाटणीही करण्यात आली आहे. पिंक मुलींचा आणि स्काय ब्ल्यू मुलांसाठी, अशी रंगांची विभागणी करण्यात आली आहे. पण तुम्हाला माहितीय का? दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Women's Day 2024) निमित्तानं जांभळा रंग विशेषतः परिधान केला जातो. फक्त जांभळाच नाहीतर इतरही आणखी दोन रंगांचा समावेश यात केला जातो.
जांभळ्या रंगाचा अर्थ (Meaning of Purple Color)
जांभळा रंग हा न्याय आणि सन्मानाचं प्रतीक आहे. महिला दिनी जांभळा रंग परिधान केल्यानं जगभरातील महिलांबाबत एकजुटीची भावना दिसून येते.
अपेक्षांनी भरलेला हिरवा (Meaning of Green Color)
हिरवा रंग सकारात्मकता आणि आशेचं प्रतिक आहे. हिरवा रंग देखील आनंदाशी संबंधित आहे. याव्यतिरिक्त हिरवा रंग समानता आणि सामर्थ्य दर्शवणारा रंग आहे. महिला दिनाच्या मोहिमेशी संबंधित हिरवा रंग प्रत्यक्षात महिलांच्या उत्साही व्यक्तिमत्त्वाशी संबंधित आहे.
शुद्धता आणि शांतीचं प्रतिक पांढरा रंग (Meaning of White Color)
पांढरा रंग शुद्धता आणि शांतीचं प्रतिक आहे. पांढऱ्या रंगाला यशाचं प्रतिक मानलं जातं. याशिवाय, हा रंग शांतता आणि दृढनिश्चय देखील दर्शवितो. जगभरात शांतता आणि सौहार्द राखण्यात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते, म्हणूनच हा रंगही या दिवसाचा एक खास भाग आहे.
कोणी केलेली सुरुवात?
महिला हक्क कार्यकर्त्या क्लारा जेटकिन यांनी 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवसाची पायाभरणी केली होती. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे झालेल्या वर्किंग वुमनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी हे सुचवलं होतं. कोपनहेगन येथे झालेल्या परिषदेत 17 देशांतील 100 महिलांनी भाग घेतला आणि क्लारा झेटकिन यांच्या या सूचनेला त्यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर 1911 मध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या दिवशी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय आणि इतर अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो.
भारतात महिला दिन कधीपासून साजरा केला जातो?
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोनं 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केलं. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचं स्वरूप बदलत गेले, तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Women's Day 2024, 8 March : 'ती'च्या सन्मासाठी खास 'जागतिक महिला दिवस'; इतिहास अन् महत्त्व माहितीय?