Omicron BF.7 Prevention : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron Variant) आणि त्याचा BF.7 सबव्हेरियंट (Omicron BF.7 Sub-Variant) याचा संसर्ग वेगाने पसरताना पाहायला मिळत आहे. चीन, जपान, अमेरिका, दक्षिण कोरियामध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. भारतातही ओमायक्रॉनचे चार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. भारतातील कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी असलं तरी, याकडे दुर्लक्ष करणं नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे या विषाणूबाबत योग्य माहिती असणं गरजेच आहे. यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबियाचं संरक्षण होईल.


कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार (Omicron) आणि त्याचा सब-व्हेरियंट BF.7 यांना घाबरण्याची गरज नाही. ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे, पण लस घेतलेल्या लोकांवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. दरम्यान, भारतात ओमायक्रॉनची लाट आधीही येऊन गेली आहे, त्यामुळे ओमायक्रॉन विरोधात लढण्यास आपलं शरीर तयार असल्याचं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे. 


ओमायक्रॉन व्हेरियंटचा सर्वाधिक संसर्ग चीनमध्ये दिसून येत आहे. चीनमधील कोरोना परिस्थिती पाहून घाबरून जाण्याची गरज नाही, तर सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाची लक्षणं वेळीच ओळखून त्यावर उपचार घेण्याची गरज आहे.


लस घेतलेल्यांसाठी BF.7 व्हेरियंट प्राणघातक नाही


भारतात ज्यांनी कोरोनाची लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि ज्यांनी बूस्टर डोस (Booster Dose) घेतला आहे अशा लोकांसाठी हा विषाणू जीवघेणा ठरणार नाही, अशी शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लाट येऊन गेली आहे. देशात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. 


कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य आहे. हा विषाणू खूप वेगाने पसरतो. रिपोर्टनुसार, ओमायक्रॉनचा (Omicron) BF.7 सबव्हेरियंट संक्रमित एक व्यक्ती सुमारे 18 लोकांना संक्रमित करू शकते. म्हणूनच आतापर्यंत समोर आलेल्या कोरोनाच्या सर्व प्रकारांमध्ये, ओमायक्रॉनचा BF.7 सबव्हेरियंट (Omicron BF.7) सर्वात संसर्गजन्य असल्याचे म्हटले जाते.


'ही' लक्षणे आढळल्यास सावध व्हा.


ओमायक्रॉनचा BF.7 सबव्हेरियंटची लागण झालेल्या लोकांमध्ये दिसणारी सुरुवातीची लक्षणे फ्लू, सर्दी आणि खोकला यासारखीच असतात. त्यामुळे यामधील फरक समजणे फार कठीण आहे.



  • सतत वाहणारे नाक

  • खोकला 

  • घसादुखी, घसा खवखवणे

  • छातीत गच्च वाटणे आणि वेदना सह खोकला


अन्न गिळण्यात अडचण


अशा परिस्थितीत संसर्ग टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे कोणामध्येही अशी लक्षणे दिसल्यास त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करावे.


तुम्ही काय कराल?


जर तुम्हाला वरीलप्रमाणे लक्षणे दिसत असतील तर तुम्ही स्वतःला क्वारंटाईन करुन घ्या आणि कोविड चाचणी करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.