Covid Booster Dose : जगभरात कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट आणि त्याचे सब व्हेरियंट BF.7 आणि BF.12 यांचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतातही ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळल्याने चिंतेचं वातावरण आहे. जगभरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासन हाय अलर्टवर आहे. केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाकडून सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचं जीनोम सिक्वेंसिंग करण्याचं आवाहन केंद्राने राज्यांना केलं आहे. 


कोरोनाने पुन्हा चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. इटली, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझील या देशांमध्ये कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक नवीन अॅडव्हायजरी जारी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच ज्या नागरिकांनी आतापर्यंत बूस्टर डोस घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर डोस घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे. तुम्ही बूस्टर डोस घेतला नसेल तर, त्याचा स्लॉट बुक करण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या.


बूस्टर डोस म्हणजे काय?


बूस्टर डोस म्हणजे सावधगिरीचा डोस. कोणत्याही लसीचा प्राथमिक डोस घेतल्यानंतर दिल्या जाणाऱ्या लसीला बूस्टर डोस असं म्हणतात. लस घेतल्यानंतर शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. कालांतराने लसीमुळे तयार झालेली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यासाठी लसीचा बूस्टर डोस दिला जातो. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बूस्टर डोस लसीच्या दोन्ही डोसनंतर काही आठवडे, काही महिने किंवा वर्षांनीही घेतला जाऊ शकतो. याआधीही, बहुतेक प्रौढांना गोवर, डांग्या खोकला किंवा मेंदुज्वर यासारख्या आजारांसाठी बूस्टर डोस देण्यात आले होते. टिटॅनससाठी (Tetanus) दर 10 वर्षांनी बूस्टर डोसची दिला जातो.


बूस्टर डोस कसा काम करतो?


काही आजारांची रोगप्रतिबंधात्मक लस दिल्यानंतर आहेत ज्यात प्राथमिक डोसनंतर बूस्टर डोस दिला जातो. प्राथमिक लसीचं काम डोसचे कार्य म्हणजे त्या रोगाच्या विषाणूविरूद्ध अँटीबॉडीज् ओळखणे आणि रोगप्रतिकारक शक्ती तयार करणे हा असतो. त्यानंतर दिलेला बूस्टर डोस शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करतो. वृद्धांसाठी किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी बूस्टर डोस हा प्रभावी ठरतो.


बूस्टर डोस स्लॉट कसा बुक करायचा?


तुम्ही तुमच्या जवळच्या आरोग्य केंद्रातून बूस्टर डोस घेऊ शकता. कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनंतर बूस्टर डोस घेतला जाऊ शकतो. जर तुम्ही आत्तापर्यंत तुमचा बूस्टर डोस घेतला नसेल, तर तुम्ही स्लॉट बुक करून बूस्टर डोस घेऊ शकता.


कसा ते जाणून घ्या.


1. सर्वात आधी कोविन (Co-WIN) पोर्टलमध्ये बूस्टर डोससाठी तुमच्या जवळचे आरोग्य केंद्र शोधा.
2. त्यानंतर लसीकरण केंद्र शोधा.
3. तुम्ही तुमचा जिल्हा, पिन कोड किंवा लोकेशनद्वारे तुमच्या जवळचे आरोग्य केंद्र शोधू शकता.
4. तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवरूनही आरोग्य केंद्र शोधता येते.
5. आता नोंदणीकृत फोन नंबरने लॉग इन करा.
6. होम पेजवरील साइन इन पर्यायावर क्लिक करा.
7. आता तुमचा मोबाईल नंबर टाइप करा.
8. आता तुम्हाला तुमच्या नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल, तो समाविष्ट करा.
9. एक नवीन विंडो उघडेल, त्यामध्ये 'शेड्यूल अपॉइंटमेंट' पर्यायावर क्लिक करा.
10. तुम्ही तुमच्या सोयीनुसार बूस्टर डोस घेण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करू शकता.