Vitamin D Deficiency : आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी सर्व पोषक तत्व गरजेची असतात. शरीरात एका जरी घटकाची जास्त कमतरता असेल तरी अनेक रोगांचा सामना करावा लागतो. यामधलाच व्हिटॅमिन डी (Vitamin D) हा आवश्यक घटक आहे. चांगल्या रोगप्रतिकाशक्तीसाठी व्हिटॅमिन डी फार गरजेचा आहे. 



याशिवाय कॅन्सर, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या धोकादायक आजारांपासून वाचण्यासाठीही व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावतो. व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये सॅल्मन, ट्यूना आणि मॅकरेल सारख्या फॅटी माशांचा तसेच संत्र्याचा रस, दूध आणि तृणधान्ये यांचा समावेश होतो. सूर्यप्रकाश देखील व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानला जातो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरावर अनेक लक्षणं दिसतात. ही लक्षणं कोणती ते जाणून घ्या.


1. केस गळणे : खरंतर केस गळण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता. केसगळतीमुळे त्रस्त लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते असे अनेक अभ्यासांमध्ये आढळून आले आहे.


2. थकवा आणि अशक्तपणा : व्हिटॅमिन डी ऊर्जा चयापचयमध्ये महत्वाची भूमिका बजावते. या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे शरीरात अशक्तपणा आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसू शकतात. 


3. नैराश्याची भावना : व्हिटॅमिन डी ला 'सनशाईन व्हिटॅमिन' असेही म्हणतात. कारण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्याचे प्रमाण शरीरात वाढू लागतं. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे बऱ्याच वेळा लोकांमध्ये नैराश्याची समस्या दिसून येते.
 
4. स्नायू दुखणे आणि जळजळ होणे : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे स्नायू दुखणे, जळजळ होणे आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या जाणवतात. विशेषत: वृद्ध लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसतं. 


5. हाडांची झीज होणे : हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल, तर हाडांना इजा होऊ शकते, ज्यामुळे किरकोळ जखमा होऊनही फ्रॅक्चरचा धोकाही वाढतो. 


शरीराला किती व्हिटॅमिन डी आवश्यक आहे


आपल्या शरीरातील दात, हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळायला हवे. शरीरातील कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे जीवनसत्त्व करते. एका निरोगी व्यक्तीला एका दिवसात 37.5 ते 50 mcg व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. तर, वाढत्या मुलांना दररोज किमान 25 mcg ची गरज असते. व्हिटॅमिन डीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Summer Health Tips : उन्हाळ्यात अनेक आजारांचं प्रमाण वाढतंय?; रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी करा 'हे' उपाय