Virat Kohli Diet : टीम इंडियाचं (Team India) रनमशीन म्हणजे, विराट कोहली (Virat Kohli). उत्तम क्रिकेटर अन् जगभरातील तरुणांचा फिटनेस आयकॉन (Fitness Icon). विराट कोहलीचे देशभरातच नाहीतर संपूर्ण जगभरात चाहते आहेत. विराट कोहलीचं मॉर्निंग रुटीन (Virat Kohli Morning Routine), तो काय खातो, तो काय डाएट (Diet Plan) फॉलो करतो, त्याचं फिटनेस रुटीन काय? याबाबत अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे की, विराट कोहली साधं पाणी पित नाही. तो अल्कलाईन वॉटर (Alkaline Water) पितो. सोप्या भाषेत सांगायचं तर, काळं पाणी. या पाण्यात 70 टक्के खनिजं असतात. पण आता न्‍यूट्रिशन एक्‍सपर्ट नेहा सहायनं एक खुलासा केला आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिनं विराट कोहलीचं डाएट सीक्रेट सांगितलं आहे.


न्‍यूट्रिशन एक्‍सपर्ट नेहा सहायनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट कोहलीनं स्वतः सांगितलं आहे की, तो अल्कलाइन डाएट फॉलो करतो. या डाएटमुळे त्याची हाडं बळकट करण्यास मदत मिळाली, त्यासोबतच मानदुखी कमी करण्यातही खूप मदत झाली. वाढत्या वयाबरोबर हाडं ठिसूळ होणं, ही सर्वसाधारण समस्या आहे. विशेषतः 35 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली फॉलो करत असलेल्या डाएटच्या मदतीनं शरीराची पीएच लेव्हल बॅलेन्स केली जाऊ शकते. 






अल्कलाईन डाएट म्हणजे नेमकं काय? (What Is An Alkaline Diet?)


शरीराचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेक पोषक घटकांसोबतच शरीरातील पीएच लेव्हलही स्थिर असणं गरजेचं असतं. जर शरीरातील पीएच लेव्हल स्थिर नसेल तर आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शरीरामध्ये पीएच लेव्हल सामान्य ठेवण्यासाठी तुमचा आहार योग्य असणं अत्यंत गरजेचं असतं. अशावेळी अल्कलाईन डाएट म्हणजेच, क्षारयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. 


अल्कलाईन डाएट का आवश्यक? (Why Alkaline Diet Necessary?)


अल्कलाईन डाएटमध्ये, प्रामुख्यानं आल्माऐवजी क्षार तयार करणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो. अल्काइन डाएट घेतल्यानं शरीरातील pH लेव्हल संतुलित राहण्यास मदत होते. 


रक्तामधील पीएच स्तर 7.35 ते 7.45 च्या मध्ये असणं गरजेचं असतं. जर शरीरातील पीएच स्थर कमी झाला तर अनेक शरीराच्या समस्यांचा सामना करावा लागतो. सतत थकवा जाणवणं, पोटाच्या समस्यांचा सामना करणं आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं यांसारख्या परिणामांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे शरीराला अनक आजार जडण्याची भिती असते. त्यामुळे शरीरातील पीएच लेव्हल योग्य प्रमाणात राखण्यासाठी अल्कलाईन डाएट फॉलो करणं गरजेचं असतं. 


अल्कलाईन डाएटचे फायदे (Benefits of Alkaline Diet)


अल्कलाईन डाएटचं काम शरीरातील पीएच लेव्हल योग्य प्रमाणात राखणं हे असतं. शरीरात जास्त आल्म पदार्थ झाल्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो. तसेच शरीरातील पेशींचं काम सुरळीत राहण्यासाठी शरीर डीटॉक्स करणंदेखील अत्यंत आवश्यक असतं. अल्कलाईन डाएट हेच काम करतं. याव्यतिरिक्त अल्कलाईन डाएट अॅन्टी-एजिंग प्रॉब्लेम्स दूर करण्यासोबतच पचनक्रिया मजबुत करण्याचेही काम करते. 


तणावापासून दूर करतं अल्कलाईन डाएट


सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस ताण-तणाव, प्रदुषण, आजार यांसारख्या समस्यांमुळे शरीरामध्ये अनेक बदल घडून येतात. अशातच आहारामध्ये काही अल्कलाईन पदार्थांचा समावेश केल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती आणि शरीरातील पीएच लेव्हल योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते. त्यामुळे शरीराचा अनेक आजारांपासून बचाव होतो. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


How to Cure Piles: पाईल्सचा त्रास औषधाविनाच ठीक होईल, पण कसा? जाणून घ्या सविस्तर