Tips To Avoid Dog Bite: सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधील मुलाचा रेबिजमुळे (Rabies) मृत्यी झाल्याचं प्रकरण चांगलंच गाजतंय. गाझियाबाजमध्ये राहणाऱ्या शाहवाजला दीड महिन्यांपूर्वी शेजाऱ्यांचा कुत्रा चावला (Dog Bite) होता. त्याने ही गोष्ट घरच्यांपासून लपवली आणि त्याचा करुण अंत झाला. या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, ही मागणी आता जोर धरु लागली आहे. कुत्र्याच्या मालकाविरुद्ध संताप व्यक्त केला जात असताना तज्ज्ञ डॉक्टरांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. कुत्रा चावण्यापासून रोखण्यासाठी पालकांना कोणती काळजी घेता येईल? हे डॉक्टरांनी सांगितलं आहे.


घटनेवर काय म्हणाले डॉक्टर?


शाहबाजसोबत घडलेली घटना अत्यंत क्लेशदायक असल्याचं डॉक्टर म्हणाले. पुढे ते म्हणाले, "या मुलाला महिनाभरापूर्वी शेजारचा कुत्रा चावला होता, पण त्याने ते गुप्त ठेवलं होतं. त्याने जखमेवर हळद लावली आणि काही आठवड्यांतच त्याच्यात रेबिजची लक्षणं दिसू लागली, ज्यात शाहबाजला पाणी आणि प्रकाशाची भीती वाटत होती. दुःखाची गोष्ट म्हणजे, त्याने त्याच्या आई-वडिलांच्या कुशीत आपला जीव सोडला. स्वत:च्या मुलाचा डोळ्यासमोर जीव जात असताना त्या पालकांची मन:स्थिती काय असेल, त्या वेदनांची कल्पनाही करवत नाही."


कुत्रा चावण्यापासून कसं रोखाल?


रेबीजवर कोणताही इलाज नाही. रेबीज झालेला कोणताही रुग्ण बरा होत नाही, यात 100 टक्के मृत्यूदर आहे. म्हणूनच कुत्रा चावण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते सर्व काही केलं पाहिजे, असं डॉक्टर म्हणतात. पालकांनी लहान मुलांना कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी काय काळजी घ्यावी? हे डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे, पाहुयात...


1. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबासोबत कुत्रा चावण्याची घटना घडू शकते हे लक्षात ठेवा आणि तुमच्या आसपास कोणासोबत ही घटना घडत असेल तर सतर्कता ठेवा. अशा घटनेकडे दुर्लक्ष न करता संबंधितांना मदत करा.


2. तुमच्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये पाळीव प्राणी मालकांसमोर (Pet Owners) तुमच्या समस्या मांडा. त्यावर मोकळेपणाने चर्चा करा. सोसायटीतील प्रत्येक पाळीव प्राण्याचं लसीकरण केलं असेल याची खात्री करा. पाळीव प्राण्याचं लसीकरण झालं आहे, असं केवळ आश्वासन पुरेसं नाही. शाहबाजच्या बाबतीतही शेजाऱ्यांनी त्यांच्या कुत्र्याला लस दिल्याचा दावा केला होता. पाळीव प्राण्यांच्या लसीकरण प्रमाणपत्राची प्रत त्यांच्या मालकांनी सोसायटीकडे जमा केली असेल, याची खात्री करा.


3. लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांच्या खेळण्याची ठिकाणं वेगळी ठेवा. गार्डनमध्ये मुलांना घेऊन जात असाल तर कुत्र्यांपासून त्यांचं संरक्षण करा.


4. मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी पाळीव प्राण्यांबाबत कडक नियम तयार करा.


5. तुमच्या मुलांना कुत्र्यांपासून लांब राहण्यासाठी प्रशिक्षित करा. उद्भवणाऱ्या जोखमींबद्दल माहिती द्या आणि कुत्र्यांशी असलेला कोणताही संपर्क त्यांनी तुमच्यापासून लपवू नये, यावर भर द्या.


6. तुमच्या कॉलनीत भटके कुत्रे असल्यास सोसायटीतील प्राणी प्रेमींशी संपर्क साधा आणि ते कुत्र्यांच्या लसीकरणाची आणि इतर गरजांची जबाबदारी घेतील याची खात्री करा.


7. तुम्ही राहत असलेल्या परिसरात पिसाळलेले कुत्रे किंवा एखाद्या समस्येने ग्रस्त असलेले कुत्रे असतील, तर त्याबद्दल योग्य प्रकियेला फॉलो करुन अ‍ॅक्शन घ्या. एनजीओ, श्वानप्रेमींना घाबरू नका. नेहमी तुमच्या समस्या मांडत राहा, कारण तुमच्या मुलांच्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही.


8. तुमच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही कुत्रा चावल्यास नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जरी ते फक्त चाटणं किंवा किरकोळ ओरखडं असतील तरीही कुत्र्याचं लसीकरण झाल्याची पुष्टी करा. मांजर किंवा माकड चावण्याबद्दल देखील याच गोष्टी लागू होतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Uttar Pradesh: भीतीने कुत्रा चावल्याचं घरच्यांपासून लपवलं; दीड महिन्यानंतर रेबिजमुळे मुलाचा मृत्यू, वडिलांच्या मिठीतच सोडले प्राण