Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील (Ghaziabad) 14 वर्षांच्या मुलाचा रेबिजमुळे दुर्दैवी मृत्यू (Rabies Death) झाला. दीड महिन्यांपूर्वी मुलाला शेजाऱ्याचा कुत्रा चावला (Dog bite) होता. आई-वडिलांच्या भीतीमुळे मुलाने ही गोष्ट घरी सांगितली नाही आणि स्वत:च जखमेवर हळद लावली. जवळपास महिना उलटल्यानंतर, म्हणजेच 1 सप्टेंबरपासून मुलगा विचित्र वागू लागला आणि त्यावेळी त्याने घरच्यांना कुत्रा (Dog) चावल्याबद्दल सांगितलं. हे कळताच कुटुंबीय त्याला रुग्णालयात घेऊन गेले, त्यावेळी डॉक्टरांनी त्याला रेबिज झाल्याचं सांगितलं. विविध रुग्णालय फिरुनही कोणी मुलाला दाखल करुन घेण्यास तयार नव्हतं. अखेर 4 सप्टेंबरला मुलानं तडफडून वडिलांच्या कुशीत जीव सोडला.


नेमकी कशी झाली रेबिजची लागण?


गाझियाबादमध्ये राहणाऱ्या या मुलाचं नाव शाहबाज होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहवाज हा विजय नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या चरण सिंह कॉलनीत राहायचा. एक-दीड महिन्यापूर्वी शाहबाजला शेजाऱ्यांचा कुत्रा चावला होता. मात्र, भीतीने त्याने घरच्यांपासून ही गोष्ट लपवली.


महिनाभरानंतर दिसली रेबिजची लक्षणं


शेजारी राहणाऱ्या एका महिलेचा कुत्रा शाहबाजला चावला. जवळपास महिना उलटला आणि शाहबाज विचित्र वागू लागला. कुत्रा चावल्याच्या काही दिवसांनंतर तो हवा, प्रकाश आणि पाण्याला घाबरु लागला. तो अंधारात राहणं पसंत करू लागला. मधेच तो मोठमोठ्याने ओरडायचा. हा सर्व प्रकार घडणं सुरू झालं आणि शाहबाजने कुटुंबियांना कुत्रा चावल्याच्या घटनेची माहिती दिली.


मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये जाऊनही उपयोग नाही


शाहबाजचे कुटुंबीय त्याला रुग्णालयात घेऊन गेले आणि डॉक्टरांनी त्याला रेबीज झाल्याचं सांगितलं. परंतु कोणतंही रुग्णालय शाहबाजवर उपचार करण्यास तयार नव्हतं. गाझियाबादच्या जिल्हा रुग्णालयात शाहबाजला नेण्यात आलं, रठच्या रुग्णालयांमध्ये शाहबाजला नेण्यात आलं, परंतु तिथेही डॉक्टरांनी शाहबाजवर उपचार करण्यास नकार दिला. दिल्लीच्या जीटीबी आणि एम्समध्येही शाहबाजचे वडील याकुब त्याला घेऊन गेले. पण सगळीकडच्या डॉक्टरांनी रेबिजवर उपचार शक्य नसल्याचं सांगितलं.


वडिलांच्या कुशीत सोडला जीव


शेवटी शाहबाजचे वडील आयुर्वेदिक उपचारांसाठी त्याला बुलंदशहरात घेऊन गेले. मात्र तिथून गाझियाबादला परत येत असताना अँब्युलन्समध्येच शाहबाजचा मृत्यू झाला. वडिलांच्या कुशीत तडफडून त्याने जीव सोडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला होत आहे, त्यात शाहबाज वडिलांच्या कुशीत हुंदके देऊन रडत होता. आमच्या मुलावर आलेली वेळ अन्य कोणावरही येऊ नये, अशी मागणी शाहबाजच्या कुटुंबियांनी केली.






कुत्र्याच्या मालकांवर गुन्हा दाखल


घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी शाहबाजच्या शेजारी राहणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून कुत्र्याच्या मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. कुत्र्याचे मालक सुनीता, आकाश, शिवानी आणि राशी यांच्यावर कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यामुळे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्या कुत्र्याला लस देण्यात आली होती, असं स्पष्टीकरण शेजारच्यांनी दिलं. या प्रकरणी कुत्रा मालकांवर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pet Animals: पाळीव प्राण्याचे चुंबन घेण्यानं होऊ शकतात गंभीर आजार; घ्या ही काळजी