National Nutrition Week 2023 : आपल्या आयुष्यात डाएटचं म्हणजे आरोग्यदायी आहाराचं (Healthy Diet ) मोठं महत्व आहे. आरोग्यदायी आहार घेतल्याने कुपोषणाला आळा बसतो तसेच इतरही असंसर्गजन्य रोगांनाही दूर ठेवण्यास मदत होते. परंतु सध्याच्या खाण्याच्या बदललेल्या सवयींमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. 


योग्य आहार न घेता बाहेरील खाद्य, फास्ट फूड खाण्यांकडे अनेकांचा कल आहे. प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वाढता वापर, बदलती जीवनशैली यामुळे आपल्या आरोग्यवर त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे. फास्ट फूडमध्ये आपल्या शरीरात अती फॅटयुक्त पदार्थ जात आहेत, शर्करा आणि मिठाचंही प्रमाण जास्त होत आहे. त्यातच बरेच लोक पुरेसे फायबरयुक्त फळे, भाज्या खात नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागत आहे. बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम हा आपल्या अन्नावरही झाला असून त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातंय. 


निरोगी आहार कुपोषणापासून संरक्षण करण्यास मदत करतो आणि आहाराशी संबंधित असंसर्गजन्य रोग जसे मधुमेह, हृदयरोग, स्ट्रोक आणि कर्करोग यांना दूर ठेवतो.


Tips For Healthy Diet : योग्य आहारयुक्त अन्नासाठी खालील सवयी ठेवा,


• कॅलरी संतुलित ठेवा.
• फॅटयुक्त अन्नाचं सेवन मर्यादित करा
• संतृप्त फॅटवरून असंतृप्त फॅट असलेले अन्नाचं सेवन करा. 
• अन्नातून ट्रान्स फॅट्स काढून टाका.
• साखर आणि मीठाचं सेवन मर्यादित करा. 


रोजच्या आहारात मिठाचं आणि साखरेचं प्रमाण किती असावं? 


आपल्या आहारात नियंत्रित कॅलरीयुक्त अन्न असावं. आपल्या रोजच्या आहारामध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त फॅटचे प्रमाण नसावं. तसेच साखरेचे (Sugar) प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावं. आपल्या रोजच्या आहारात 5 ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचा (Salt) समावेश  नसावा. त्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक रोगांना दूर ठेवता येऊ शकतं. 


जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वतीने काही ध्येयं ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये 2025 सालापर्यंत लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण कमी करणे, लठ्ठपणा कमी करणे तसेच मिठाचे आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेऊन अनेक आजारांना दूर ठेवणे, निरोगी जीवन जगणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात येणार आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


ही बातमी वाचा: