Healthy Snacks For Hunger : सध्या बहुतेक जण वाढत्या वजनामुळे (Weight Loss) त्रस्त आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही जण डाएटींग (Dieting) तर काही जण व्यायामाचा उपाय निवडतात. मात्र या गोष्टीसोबत केल्या अधिक फायदा होतो. दरम्यान, डाएटींग करताना काही वेळा खूप भूक लागते, क्रेविंग्ज होतात. या भूकेवर नियंत्रण मिळवत तुम्हाला क्रेविंग्जपासून सुटका मिळवायची असेल, तर त्यासाठी सोपा मार्ग आहे. असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्याने शरीरातील कॅलरी वाढत नाही पण भरपूर ऊर्जा मिळते आणि पोट भरलेले राहते. त्यामुळे सारखी भूक लागत नाही. 


वजन कमी करण्यासाठी तुमचा आहार सर्वात महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही दिवसभरात जितक्या कॅलरीज सेवन करता, त्याहून अधिक कॅलरीज तुम्ही बर्न करायला हव्यात. जर तुम्ही एका दिवसात खूप जास्त कॅलरीज घेत असाल आणि खूप कमी कॅलरीज बर्न करत असाल तर व्यायाम करूनही तुमचं वजन कमी होणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. तुमचा आहार आणि खाण्याच्या सवयींचा तुमच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. डाएटींग करताना तुम्हाला खूप भूक लागत असेल तर तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकता. आम्ही असे पदार्थ सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं पोट भरेल आणि वारंवार भूक लागणार नाही.


प्रथिनं आणि फायबरचं सेवन कमी केल्याने सारखी भूक लागते. तुम्ही पौष्टिक आहार घेत नाही, ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागते. प्रथिने आणि फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं आणि शरीराला ऊर्जा मिळत राहते. बहुतेकांना सारखी भूक लागते, या क्रेविंग्जपासून सुटका मिळवायची असेल तर 'या' पदार्थांचं सेवन करा.


1. चना स्प्राउट्स


चण्याचा हेल्दी फूडमध्ये समावेश केला जातो. मोड आलेले चणे खाल्ल्यानं शरीराला पुरेसे प्रथिनं आणि फायबर मिळतात. यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. प्रथिने पचण्यास वेळ लागतो, ज्यामुळे भूक शमते. स्प्राउट्समध्ये बी-व्हिटॅमिन्स देखील भरपूर असतात. हा तुमच्यासाठी योग्य स्नॅक्स आहे.


2. बदाम


भूक लागल्यावर बदाम खा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट, प्रोटीन आणि फायबर मिळतात. प्रोटीन आणि फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यानं तुमचं पोट भरलेलं राहतं आणि जास्त वेळ भूक लागत नाही. 


3. ताक


भूक क्षमवण्यासाठी तुम्ही ताक पिऊ शकता. ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि भूकही शांत होते. मिड स्नॅक्ससाठीही हा एक चांगला पर्याय आहे. दह्यापासून बनवलेलं ताक प्रोबायोटिक्सने समृद्ध असते. यामध्ये व्हे प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. काही लोक जेवणानंतर अन्न पचवण्यासाठी ताकही पितात. ताकामधील कॅल्शियम आणि प्रथिनांमुळे जास्त वेळ भूक लागत नाही.


4. भाज्यांचा रस


भाज्यांचा भूक शांत करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीराला योग्य पोषण मिळतं. तुम्ही भाज्यांच्या रसामध्ये आळशी बिया मिसळून त्याचंही सेवन करु शकता. भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. भाज्यांचा रस प्यायल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही. यामुळे पोट, पचन आणि शरीर निरोगी राहते.


5. नारळ 


भूक शांत करण्यासाठी तुम्ही नारळही खाऊ शकता. नारळात जास्त प्रमाणात फायबर असते, जे खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. नारळात अनेक घटक आढळतात शरीरात जमा झालेली चरबी कमी करण्यास मदत करतात. नारळ खाल्ल्याने वजनही झपाट्यानं कमी होतं.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या