Health Tips : येत्या काही महिन्यांमध्ये गणेश चतुर्थी, दसरा, ओणम आणि असे कितीतरी सण रांगेने येणार आहेत. सणासुदीचे हे दिवस आपल्या सगळ्यांसाठीच खास असतात, कारण यावेळी सगळे कुटुंबिय फक्त सण साजरा करण्यापुरतेच नव्हे, तर आपल्या आप्तेष्टांच्या गाठीभेटी घेण्यासाठी एकत्र जमतात. सणांचे हे महत्त्व आपण अर्थातच जाणतो. पण, त्याचवेळी कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रसार नियंत्रणात रहावा आणि संक्रमणाचा दर कमी व्हावा, यासाठी विशिष्ट खबरदारी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.


यासाठी प्रत्येकानेच आपले सण घरापुरतेच मर्यादित ठेवायला हवेत आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. गर्दीच्या ठिकाणी जावे लागलेच, तर न चुकता मास्क घातला पाहिजे आणि आपले हात शक्य तितके सॅनिटाइझ करायला हवेत. या छोट्या छोट्या गोष्टी, विशेषत: व्यक्तिगत पातळीवर पाळल्यास आपण विषाणू व त्याच्या व्हेरियंट्सच्या बाधेपासून अनेकांना खूप चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवू शकतो.


लसीकरण करणे गरजेचे!


आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सणासुदीच्या काळात आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने लस टोचून घेतली आहे, याची खातरजमा करायला हवी. कोरोनाची लस कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंना रोखण्याच्या बाबतीत परिणामकारक ठरली आहे, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने या लसीचे बूस्टर डोस घ्यायला हवेत. एकदा एखाद्या व्यक्तीने लस घेतली की, त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती बळकट होते आणि तिचे शरीर अधिक विषाणूंना परतवून लावण्यासाठी सज्ज होते. त्याचवेळी एखादी व्यक्ती जेव्हा लस घेते, तेव्हा आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्तींना संरक्षण देण्याच्या कामीही ती महत्त्वाची भूमिका बजावते. यंदा सणांमध्ये आणि गर्दीमध्ये सहभागी होताना कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील चीफ इंटेन्सिव्हिस्ट डॉ. संदीप पाटील यांनी सांगितलेल्या ‘या’ सूचना जरूर ध्यानात ठेवाव्यात :


* इतरांशी संपर्कात येणे शक्यतो टाळायला हवे, विशेषत: सध्याची परिस्थिती लक्षात घेत एकमेकांना भेटताना नम्रतेने केलेला नमस्कार अधिक सुरक्षित ठरेल.


* जिथे खूप लोक जमले असतील, अशा ठिकाणांपासून दूर रहा आणि शक्यतो सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. सध्या मास्क लावणे अनिवार्य नाही, तरीही प्रत्येकाने मास्क घालायला हवा. विशेषत: घराबाहेर पडताना हे कटाक्षाने करायला हवे. तुमचे नाक, तोंड आणि हनुवटी झाकलेली असायला हवी.


* शक्यतो सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. कारण, त्यामुळे विषाणू संसर्गाचा धोका कमी होतो. तुम्ही बाहेरून घरात येत असाल, तर आपले हात सॅनिटाइझ करा.


* तुम्हाला कफ झाला असेल, तर खोकताना तोंडावर रुमाल ठेवा.


* आपला चेहरा आणि नाक यांना, विशेषत: न धुतलेल्या आणि सॅनिटाइझ न केलेल्या हातांनी विनाकारण स्पर्श करू नका.


* घरगुती पार्टीचा बेत असेल तर बोटांनी उचलून खाता येण्यासारखे, प्लेट्स, कटलरी किंवा कप्सची देवाणघेवाण करण्याची फारशी गरज भासणार नाही, असे पदार्थ ठेवा. शिवाय अशी गेट-टूगेदर्स घराबाहेर करणे अधिक चांगले. कारण, घरांमध्ये वायूविजनाची फारशी चांगली सोय नसते, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.


* सकस अन्न खा आणि फिझ्झी ड्रिंक्स पिणे टाळा म्हणजे तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होणार नाही.


* कमीत कमी पाहुण्यांना बोलवा किंवा तुमच्या आप्तेष्टांना आपापल्या घरांतूनच सणांचा आनंद साजरा करता यावा यासाठी ई-दर्शनसारख्या पर्यायांचाही वापर तुम्ही करू शकता.


* सण साजरा करून घरी परतल्यानंतर आपल्या बूट-चपला घराबाहेरच ठेवा आणि लगेच आंघोळ करा.


* कोरोनाची लक्षणे आढळल्यास स्वत:ला तत्काळ वेगळे करा आणि पुढील उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)


महत्वाच्या बातम्या :