PM Modi Congratulate to Delhi AIIMS Doctors: दिल्ली एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांनी एक दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या हृदयावर डॉक्टरांनी यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली. अशातच आता स्वतः पंतप्रधानांनी दिल्ली एम्समधील डॉक्टरांचं अभिनंदन केलं आहे. तसेच, पंतप्रधानांनी डॉक्टरांच्या यशाचं कौतुकही केलं आहे.
दिल्ली एम्समधील डॉक्टरांनी अवघ्या 90 सेकंदांत आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली. द्राक्षाच्या आकाराएवढंच या बाळाचं हृदय होतं. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भारतीय डॉक्टरांच्या कौशल्याचं आणि त्यांच्या नवकल्पनांचं कौतुक केले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचं ट्वीट शेअर करून पंतप्रधानांनी ट्वीट केलं आहे. "भारताच्या डॉक्टरांचा, त्यांच्या कौशल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.", असं मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मनसुख मांडवीया यांचं ट्वीट काय?
आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करत मंगळवारी (14 मार्च) एम्सच्या डॉक्टरांचं अभिनंदन केलं. मनसुख यांनी ट्वीट केलं की, "@AIIMS_NewDelhi येथील डॉक्टरांच्या टीमचं मी अभिनंदन करतो. डॉक्टरांनी केवळ 90 सेकंदात द्राक्षाच्या आकाराचं हृदय असणाऱ्या एम्ब्रॉयच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी प्रार्थना."
आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया
ANI कडून मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय महिलेचा यापूर्वी तीन वेळा गर्भपात झाला होता. त्यामुळे तिला तिच्या पोटात वाढत असलेलं बाळ कोणत्याही परिस्थितीत निरोगी हवं होतं. महिलेचे अल्ट्रासाऊंड केल्यानंतर डॉक्टरांनी बाळाच्या हृदयाची स्थिती सांगितली. त्यांनी म्हटलं की, बाळाच्या हृदयाची वाढ व्यवस्थित होत नाही. त्यानंतर महिलेनं सर्व परिस्थिती आपल्या पतीला सांगितली आणि एम्ब्रॉयवर शस्त्रक्रिया करुन घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डॉक्टरांनी द्राक्षाएवढ्या आकाराच्या हृदयावर बलून डायलेशन (Balloon Dilation) शस्त्रक्रिया केली.
डॉक्टरांनी सांगितलं की, गर्भात वाढत असलेल्या बाळावर उपचार केल्यास त्याचा जन्मानंतर सामान्य विकास होऊ शकतो. याशिवाय, त्यांनी सांगितलं की, आम्ही या शस्त्रक्रियेला लागणारा वेळ मोजला होता. जो फक्त 90 सेकंद होता. शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टरांनी सांगितलं की, शस्त्रक्रियेत त्यांनी आईच्या पोटातून बाळाच्या हृदयात सुई घातली आणि बलून डायलेशनद्वारे ही प्रक्रिया केली.
दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर, गर्भातील बाळाचा विकास चांगला होत आहे. AIIMS मधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि फेटल मेडिसिन स्पेशलिस्टच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. या शस्त्रक्रियेत सहभागी डॉक्टरांच्या पथकाने सांगितलं की, आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठीक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :