H3N2 Virus Symptoms : देशात सध्या H3N2 व्हायरल विषाणूचा संसर्ग वाढताना दिसत आहे. या संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. बदलत्या हवामानामध्ये पसरणाऱ्या या विषाणूमुळे सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशासह महाराष्ट्रामध्येही या विषाणूने डोकं वर काढलं आहे. मुंबई आणि पुण्यासह इतर शहरांमध्येही H3N2 विषाणूचा (H3N2 Virus) संसर्ग वाढत आहे. देशात या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. H3N2 इन्फ्लूएंझामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क (Mask) वापरण्याचं आवाहन नीती आयोगाने केलं आहे.
देशात H3N2 विषाणूचा कहर
H3N2 फ्लू विषाणू H1N1 फ्लूचा उपप्रकार आहे. बदलत्या हवामानामुळे या विषाणूचं म्युटेशन झालं आहे. सध्या या विषाणूचा पसरणारा प्रकार अधिक धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. या विषाणूची लक्षणे कोरोनासारखी आहेत. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी याची लक्षणे वेळीच ओळखणं आवश्यक आहे. लहान मुले, वृद्ध आणि गरोदर स्त्रिया यांना या विषाणूच्या संसर्गाचा धोका अधिक आहे. लहान मुलं, वृद्ध आणि गरोदर महिलांमध्ये या विषाणूची लक्षणे वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतात. ही लक्षणे कोणती ते जाणून घ्या.
लहान मुलांमध्ये आढळणारी लक्षणे
लहान मुलांना H3N2 इन्फ्लूएंझाचा संसर्ग झाल्यास त्यांना तीव्र ताप, पोटदुखी, मळमळ, उलट्या, खोकला, सर्दी, कफ न निघणे किंवा न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागतात.
गर्भवती महिलांना 'ही' लक्षणे दिसल्यास सतर्क राहा
H3N2 विषाणू संसर्ग झाल्यास गर्भवती महिलांमध्ये काहीशी वेगळी लक्षणे दिसतात. गर्भवती महिलांना तीन दिवसांपेक्षा जास्त ताप असल्यास काळजी घ्यावी आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ब्राँकायटिस, खोकला आणि सर्दी, जास्त कफ, अंगदुखी, डोकेदुखी H3N2 इन्फ्लूएंझाची ही लक्षणे गर्भवती महिलांमध्ये दिसून येतात
प्रौढांमध्ये H3N2 ची लक्षणे
छाती गच्च वाटणे, तीन दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, जुलाब, मळमळ, डोकेदुखी, अशक्तपणा ही प्रौढांमध्ये दिसणारी लक्षणे आहेत. प्रौढांना विशेषत: वृद्ध व्यक्तींना फुफ्फुसात संसर्ग वाढल्यास श्वास घेण्यास गंभीर त्रास होऊ शकतो.
आधीच आजारी असणारी व्यक्ती
काही व्यक्ती नेहमी व्हायरल सर्दी, खोकला किंवा ताप या संसर्गाला बळी पडतात. काही लोकांना फुफ्फुसाच्या गंभीर संसर्गाचाही सामना करावा लागतो. अशा लोकांना छातीत कफ जमा झाल्यामुळे वेदना, ताप, श्वास घेण्यास त्रास, घसादुखी, कानात जडपणा येणे ही लक्षणे दिसू शकतात.
अशी घ्या काळजी!
H3N2 इन्फ्लूएंझा हा व्हायरल फ्लू आहे. हे इन्फेक्शन हवेद्वारे किंवा स्पर्शाद्वारे पसरते. संक्रमित व्यक्तीच्या जवळपास उपस्थित असलेल्या किंवा संक्रमित पृष्ठभागाला स्पर्श करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला याचा संसर्ग होऊ शकतो. H3N2 विषाणूवरील सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही पण सावधगिरी बाळगून तुम्ही याच्या संक्रमणापासून वाचू शकता. त्यासाठी हात स्वच्छ धुवा. सॅनिटायझर वापरा, खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकून ठेवा, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि गेल्यास मास्क वापरा. संक्रमित व्यक्तीपासून दूर राहा, मिठाच्या पाण्याने गुळण्या करा आणि लक्षणे आढळल्यास वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
H3N2 Virus : सावधान! मास्क, लस आणि सॅनिटायझेशन; H3N2 पासून बचावासाठी वापरा ही त्रिसूत्री