Delhi AIIMS : एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांना मोठं यश मिळालं आहे. महिलेच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या हृदयावर 90 सेकंदात डॉक्टरांनी उपचार केले आहेत. एम्स दिल्लीच्या डॉक्टरांच्या टीमने यासंदर्भात सांगितलं की, न जन्मलेल्या मुलाचं हृदय द्राक्षाएवढं खूपच लहान होतं, ज्याच्यावर बलून डायलेशन (Balloon Dilation) यशस्वीपणे करण्यात आलं आहे. अशा प्रकारची शस्त्रक्रिया देशात पहिल्यांदाच करण्यात आली आहे.
आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करत मंगळवारी (14 मार्च) एम्सच्या डॉक्टरांचं अभिनंदन केलं. मनसुख यांनी ट्वीट केलं की, "@AIIMS_NewDelhi येथील डॉक्टरांच्या टीमचं मी अभिनंदन करतो. डॉक्टरांनी केवळ 90 सेकंदात द्राक्षाच्या आकाराचं हृदय असणाऱ्या एम्ब्रॉयच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. त्यासोबतच मांडविया म्हणाले की, आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी प्रार्थना."
महिलेचा यापूर्वी तीन वेळा झालेला गर्भपात
ANI कडून मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय महिलेचा यापूर्वी तीन वेळा गर्भपात झाला आहे. त्यामुळे तिला तिच्या पोटात वाढत असलेलं बाळ कोणत्याही परिस्थितीत निरोगी हवं आहे. महिलेचे अल्ट्रासाऊंड केल्यानंतर डॉक्टरांनी बाळाच्या हृदयाची स्थिती सांगितली. त्यांनी म्हटलं की, बाळाच्या हृदयाची वाढ व्यवस्थित होत नाही. त्यानंतर महिलेने सर्व परिस्थिती आपल्या पतीला सांगितली आणि एम्ब्रॉयवर शस्त्रक्रिया करुन घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर, गर्भातील बाळाचा विकास चांगला होत आहे. AIIMS मधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि फेटल मेडिसिन स्पेशलिस्टच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. या शस्त्रक्रियेत सहभागी डॉक्टरांच्या पथकाने सांगितलं की, आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठीक आहे.
अवघ्या 90 सेकंदांत शस्त्रक्रिया
डॉक्टरांनी सांगितलं की, गर्भात वाढत असलेल्या बाळावर उपचार केल्यास त्याचा जन्मानंतर सामान्य विकास होऊ शकतो. याशिवाय, त्यांनी सांगितलं की, आम्ही या शस्त्रक्रियेला लागणारा वेळ मोजला होता. जो फक्त 90 सेकंद होता. शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टरांनी सांगितलं की, शस्त्रक्रियेत त्यांनी आईच्या पोटातून बाळाच्या हृदयात सुई घातली आणि बलून डायलेशनद्वारे ही प्रक्रिया केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Health Tips : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची ही आहेत 11 लक्षणं; तुमच्यामध्येही आढळल्यास वेळीच सावध व्हा