Maharashtra Corona Update : मागील काही दिवसांमध्ये राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. राज्यात 24 तासात रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी (13 मार्च) राज्यात 61 कोरोना रुग्ण आढळले होते तर मंगळवारी (14 मार्च) या रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 155 रुग्ण आढळले होते. त्यात दोघांचा मृत्यू देखील झाला आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. असं असलं तरीही घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे.
तज्ञ काय सांगतात?
सध्या राज्यामध्ये H3N2 हा विषाणू आणि कोविडचेही रुग्ण वाढताना दिसत आहेत. H3N2 हा कोणताही नवा विषाणू नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे चिंता करण्याती गरज नाही. इन्फ्ल्यूएन्झा विषाणूचे मुख्य चार प्रकार आहेत. A, B, C आणि D. यापैकी A आणि B प्रकारातील विषाणूंना आपण सिझनल फ्ल्यू म्हणून ओळखतो तर H1N1, H3N2 हे दोन्हीही विषाणू इन्फ्ल्यूएन्झा A प्रकारातील विषाणू आहेत. हे दरवर्षी आढळतात फक्त यावर्षी H3N2 हा विषाणू थोडा अधिक प्रमाणात आढळत आहे, असं साथीच्या रोगांचे माजी राज्य निरिक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी सांगितलं आहे.
घाबरु नका...!
मुख्यत्वे फेब्रुवारी महिन्यापासून राज्यातील अनेक भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानामध्ये मोठी तफावत जाणवत आहे. अशा प्रकारचे विषम वातावरण हे विषाणू वाढीसाठी अधिक पोषक आहे. त्यामुळे आपल्याला सध्या विषाणूजन्य तापाची साथ दिसते आहे. हा नवीन विषाणू नाही. त्याच्या प्रसाराची पद्धत, लक्षणे ही इतर कोणत्याही विषाणू सारखीच आहेत. त्यामुळे या संदर्भात लोकांनी घाबरून जाण्याची काहीही गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कोणती काळजी घ्याल?
-वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे.
-पुरेशी विश्रांती घेणे.
-वैद्यकीय सल्ल्याने आवश्यक वाटल्यास औषधं सुरू करणे.
- गरम पाण्याची वाफ घेणे
-कोमट पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून गुळण्या करणे.
साथ पसरू नये यासाठी काय करावं?
इन्फ्ल्यूएन्झा आणि कोविड या दोन्हीही विषाणूंचा प्रसार ,प्रादुर्भाव हा रुग्णाच्या शिंकण्या खोकल्यातून होतो. त्यामुळे शिंकताना खोकताना नाका तोंडावर रुमाल धरणे. हात वारंवार स्वच्छ धुणे.सर्दी खोकला असेल तर जनसंपर्क कमी करणे.पुरेशी विश्रांती घेणे, मानसिक ताण टाळणे धूम्रपान आणि तंबाखू खाणे टाळणे. आहारामध्ये विटामिन सी युक्त लिंबू, आवळा असे पदार्थांचं मोठ्या प्रमाणावर सेवन ठेवणे. या सगळ्या माध्यमातून आपण इन्फ्ल्यूएन्झा आणि कोविड या दोन्ही विषाणूंवर उत्तम नियंत्रण ठेवू शकतो.
लसीकरण करा...
इन्फ्ल्यूएन्झासाठी लस उपलब्ध आहे. ही लस इन्फ्ल्यूएन्झा A, H1N1, H3 N2 आणि B चे दोन उपप्रकार अशा चारही सीजनल विषाणूंवर गुणकारी आहे. इन्फ्ल्यूंझा हा आजार मधुमेह उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीमध्ये गरोदर महिला किंवा इतर काही आजार असणाऱ्या ज्या व्यक्तीमध्ये गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे अशा अति जोखमीच्या व्यक्तींनी इन्फ्ल्यूएन्झा प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. ही लस दरवर्षी मार्च ते मे या काळामध्ये घेतली तर ती अधिक परिणामकारक सिद्ध होते कारण त्यामुळे इन्फ्ल्यूएन्झा आजाराचे दोन्हीही सीजन हिवाळा आणि पावसाळा कव्हर होतात.
कोणत्या शहरात किती रुग्ण?
पुणे परिसरात कोरोनाचे 75 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 49, नाशिकमध्ये 13, नागपूरमध्ये 8 आणि कोल्हापुरात 5 रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी औरंगाबाद, अकोला येथे प्रत्येकी दोन आणि लातूरमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे. जीव गमावलेले दोन्ही रुग्ण केवळ पुणे विभागातील आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे काळजी घेणे गरजेचे झाले आहे.