Pets are Reason of Illness : अलिकडे पाळीव प्राण्यांचं (Pets) प्रमाण वाढताना दिसत आहे. शहरी भागात हे प्रमाण जास्त आहे, विशेषत: कुत्रा (Dog) आणि मांजर (Cat) पाळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, पाळीव प्राणी पाळल्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याचा दावा नवीन संशोधनात करण्यात आला आहे. एका नव्या संशोधनात दावा करण्यात आला आहे की, कुत्रा आणि मांजर या सारखे पाळीव प्राणी मानवाच्या जास्त संपर्कात असतात, त्यामुळे यांच्यामार्फत आजार पसरण्याचा धोका जास्त असतो.
पाळीव प्राणी तुमच्या आजाराचं कारण ठरत आहे का?
गावाकडे लोक गाय, म्हैस, बकरी, मेंढी पाळतात. तर शहरी भागात कुत्रे आणि मांजरी पाळणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामधील एक फरक म्हणजे गावाकडील लोक गाय, म्हशी असे प्राणी पाळतात, पण त्यांची राहण्याची व्यवस्था घरापासून थोडी दूर किंवा गोठ्यामध्ये करतात. त्यांना कुत्रा किंवा मांजरीप्रमाणे अंथरुणाच जागा देत नाहीत. यामुळे अशा प्राण्यामुळे आजारपणाचा धोका कमी असतो, पण कुत्रा आणि मांजरीच्या बाबतीत हा धोका जास्त असल्याचा दावा संशोधनात करण्यात आला आहे.
संशोधनात धक्कादायक खुलासा
शहरी भागात बहुतेक लोक कुत्रे किंवा मांजरी पाळतात. घरातील एका सदस्याप्रमाणे त्यांची काळजी घेतात, त्यांचं खाणं-पिणं याची विशेष काळजी घेतली जाते. इतकंच नाही तर कुत्रा आणि मांजरी मालकांच्या अंगा-खांद्यावर बागडतात आणि त्यांच्या अंथरुणातच झोपतात. यामुळे अशा प्राण्यांपासून रोग पसरण्याचा धोका जास्त असल्याचं या अहवालात सांगितलं गेलं आहे.
अहवालात धक्कादायक बाब समोर
नुकतेच डायसन ग्लोबल डस्टने पाळीव प्राण्यांवर संशोधन केले. या संशोधन अहवालानुसार, पाळीव प्राणी पाळणारे भारतीय लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांची स्वच्छता, त्यांचे रोग आणि त्यांच्यावर आढळणारे विषाणू यांच्याबाबत खूप जागरूक असतात. पण जेव्हा पाळीव प्राणी आणि घराची दैनंदिन साफसफाईचा प्रश्न येतो, तेव्हा चारपैकी फक्त एक भारतीय याकडे प्राधान्याने पाहतो. त्यामुळे अनेकवेळा पाळीव प्राणी आधी आजारी पडतात आणि त्यानंतर हा आजार माणसात पसरतो, असं संशोधनात समोर आलं आहे.
पाळीव प्राण्यांद्वारे माणसांना संसर्ग
एमडीपीआय ओपन ऍक्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालानुसार, प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंद्वारे संसर्गजन्य रोग माणसांमध्ये पसरतात. या संशोधनाच्या अहवालानुसार, बॅसिलस अँथ्रेसिस हा एक प्रकारचा जीवाणू आहे, जो प्राण्यांमध्ये घातक रोग पसरवतो. या जीवाणूचा आकार रॉडसारखा असतो.
त्यामुळे प्राण्यांमध्ये अँथ्रॅक्स नावाचा आजार पसरतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आजाराची लागण झालेल्या प्राण्याच्या संपर्कात माणूस आल्यास हा आजार माणसालाही होतो. या संशोधनात पाळीव प्राण्यांचे केस, कोंडा आणि त्वचेच्या कणांवर संशोधन करण्यात आलं आहे. पाळीव प्राण्यांचे केस, कोंडा यामुळे प्राण्यांचे मालक आणि पाळीव प्राण्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लहान मुलांमध्ये ऍलर्जी होण्याचा धोकाही संभवतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :