Health Tips : मीठाशिवाय जेवणाची कल्पना करणं अशक्यच आहे. जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थांत मिठाचा (Salt) वापर केला जातो. याबाबत नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेने असं सांगितलं आहे की, मीठ हे आपल्या आयुष्यात जागतिक किलर म्हणून काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, WHO ने आपल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, अति मिठाच्या सेवनामुळे दरवर्षी सुमारे 1.89 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. या सवयीमुळे उच्च रक्तदाबाची (High BP) समस्या उद्भवते आणि हळूहळू हृदयाशी संबंधित त्रास होण्यास सुरुवात होते.
काही लोक जेवणात मीठ घालतात तर काहींना सॅलाडमध्ये, फळांमध्ये वरून मीठ घालण्याचीसवय असते. ही सवय आपल्या आरोग्यासाठी फार घातक आहे. यापासून जर संरक्षण करायचं असेल तर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
तज्ज्ञ काय म्हणतात?
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सोडियमचा वापर जास्त मिठामुळे होतो. याचा परिणाम आपल्या रक्तदाब पातळीवर होतो. जर मिठाचे सेवन कमी केले नाही तर मात्र हृदयविकाराचा धोका वाढतो.
डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की, एका दिवसांत फक्त 5 ग्रॅम मीठाचं सेवन आरोग्यासाठी उत्तम आहे. पण, तरीही लोक जास्त प्रमाणात मीठाचं सेवन करतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या वाईट सवयीमुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते ज्यामुळे हाय बीपीचा त्रास सुरु होतो. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, फक्त अन्नाच्याच माध्यमातून नाही तर फास्ट फूड, चिप्सच्या माध्यमातून देखील अति मीठाचं सेवन केलं जातं आणि अशा प्रकारे हे प्रमाण वाढतं.
'अशा' प्रकारे मीठाचे सेवन कमी करा
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आपण नेहमी ताजे तयार केलेले अन्न खावे. असे केल्याने तुम्ही तुमच्या सोयीनुसार गोष्टींमध्ये मीठ घालू शकाल.
प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा प्री-पॅकेज केलेले पदार्थ खाणे टाळा. कारण त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. इन्स्टंट नूडल्स, फ्रोझन मील यांसारख्या गोष्टींचं सेवन टाळा.
मसाले किंवा औषधी वनस्पती वापरा कारण त्यांच्याद्वारे तुम्ही जेवणाची चव वाढवू शकता. काही लोक जेवणाला चवदार बनवण्यासाठी अतिरिक्त मीठ वापरतात. पण मसाले किंवा औषधी वनस्पती वापरून आपण या वाईट सवयीपासून दूर राहू शकतो. यासाठी लसूण, कांदा, लिंबू आणि इतर औषधी वनस्पतींचा जास्त वापर करा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.