Paracetamol Dangerous for Health : अनेकांना ताप, अंगदुखी, डोकेदुखी या सारखी समस्या सतावते. अशा स्थितीत बहुतेक वेळा आपण डॉक्टरांकडे जाणं टाळतो आणि त्रास दूर करण्यासाठी घरीच पॅरासिटामॉल (Paracetamol), इबुप्रोफेन (Ibuprofen) किंवा कोडइन (Codeine) यासारख्या औषधांचं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन करतो. तुम्हीही असं करत असाल तर, थांबा. वारंवार पॅरासिटामॉलचे सेवन आरोग्यासाठी नुकसानकारक असून ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. नवीन संशोधनात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभ्यासात अशा औषधांच्या वापराबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 


डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासिटामॉल सेवन हानिकारक


कोणताही विचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासिटामॉल आणि त्यासारख्या औषधांचं सेवन करणाऱ्या लोकांसाठी ही बातमी आहे. काही लोक सौम्य वेदना असल्यास कोणताही विचार न करता मेडिकल स्टोअरमध्ये जातात आणि स्वतः पॅरासिटामॉल घेतात. पण हे करणं अत्यंत चुकीचं असून याचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम  होऊ शकतो. पॅरासिटामॉल तुमच्या वेदना तेवढ्यापुरत्या वेळेसाठी दूर करतं पण, हे आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक आहे.


15 हजारांहून अधिक लोकांवर संशोधन


The BMJ मध्ये 22 मार्च 2023 रोजी प्रकाशित झालेल्या एका संशोधनात ही मोठी माहिती समोर आली आहे. या संशोधनात एकूण 15,134 लोकांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासात 69 वेगवेगळ्या औषधांच्या परिणामांचं निरीक्षण करण्यात आलं. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने शरीरशास्त्रीय उपचारात्मक रासायनिक प्रणालीतील गैर-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधे, पॅरासिटामॉल, ओपिओइड्स, अँटीकॉनव्हलसंट्स, अँटीडिप्रेसंट्स, स्नायू शिथिल करणारे किंवा कॉर्टिकोस्टिरॉईड्स यांचा समावेश केला होता.


वेदना कमी होतात, पण नुकसान अधिक


या संशोधनात आढळून आलं की, पेनकिलर म्हणजे वेदनाशामक औषधांमुळे वेदना कमी होतात पण, त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. या औषधांचा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टिमवर दुष्परिणाम होऊन यामुळे मळमळ, अपचन, उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणे दिसून आली. थकवा, चक्कर येणे आणि डोकेदुखी यासारख्या मज्जासंस्थेशी संबंधित समस्याही दिसून आल्या. विशेषतः ज्या लोकांना पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना होत्या आणि त्या लोकांनी या औषधांचं जास्त सेवन केल्याचंही संशोधनात समोर आलं आहे.


यकृतालाही हानी पोहोचू शकते


पाठदुखी आणि ऑस्टियोआर्थरायटिसच्या उपचारांसाठी पॅरासिटामॉल घेतल्याने जीवनशैलीत सुधारणा होत नाही. वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामॉलचा प्रभाव तितका प्रभावी नव्हतास, असं संशोधनात समोर आलं. या औषधाच्या जास्त वापरामुळे यकृत खराब होण्याचा धोका वाढतो, असंही संशोधकांनी सांगितलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Covid-19 : कोरोना संसर्ग झाल्यास 'ही' औषधं घेऊ नका, प्लाझ्मा थेरपीही टाळा; आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना