Mumbai News : पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यात MD ड्रग्जच्या कारखान्यांवर छापेमारी केली जात आहे. यातच आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचं MD ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. मात्र, राज्यभर ड्रग्जच्या व्यसनाचं जाळं झपाट्याने पसरताना दिसत आहे. त्यातच मानसोपचार तज्ज्ञांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्याच्या काळात व्यस्त जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या ताणामुळे व्यसनाचं प्रमाण तरूणाईत जास्त वाढलं आहे. या व्यसनामुळे अनेक लोक कर्जबाजारी झाले आहेत. याच संदर्भात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा, यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यसनामुळे अनेक लोक कर्जबाजारी होत आहेत. एकाने तर व्यसनावर 40 लाखांचे कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. खरंतर कोरोना महामारीनंतर मेफेड्रोनच्या वापरात वाढ दिसून आली आहे. यामध्ये सर्वात जास्त समावेश तरूण, व्यापारी आणि कॉर्पोरेट वर्गातील लोकांचा होता. याचं मुख्य कारण म्हणजे स्पर्धात्मक युग, वाढतं नैराश्य किंवा मानसिक आनंदासाठी लोक ड्रग्सचं सेवन करत असल्याचं समोर आलं आहे.
खरंतर, ड्रग्स घेण्याची सुरुवातच मुळात मैत्रीपासून होते. यामध्ये तुमची संगत कोणती आणि कशी आहे हे देखील अवलंबून आहे. तुमची संगत जर वाईट असली तर तुम्ही ड्रग्सच्या आहारी जाता. हळूहळू त्याची चव आवडत जाते आणि नैराश्यावर अशा प्रकारे मात करत करत त्याचं व्यसनात कधी रूपांतर होतं हे ड्रग्स घेणाऱ्यांनाही कळत नाही.
मुंबईत ड्रग्सची वाढती मागणी
मुंबईत ड्रग्सची मागणी इतकी जास्त आहे की व्यसनाधीन लोकं त्याच्या आहारी गेले आहेत. जर एखादी व्यक्ती 100 रुपये कमावत असेल तर तो एमडी ड्रग्जवर 90 रुपये खर्च करतो. त्यामुळे व्यसन पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे कुटुंब आणि आर्थिक स्थिती बिघडते.
या संदर्भात डॉ. सागर मुंदडा सांगतात, 'ज्यांनी 50,000 ते 40 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे अशा काही रुग्णांवर मी उपचार करतोय. मात्र, यामध्ये एक गोष्ट दिसून येतेय की उपचारा दरम्यानही हे लोक स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.' एमडी औषधे लैंगिक गरजांकडे आकर्षित करतात आणि परिणामी विविध रोग समोर येतायत. चवीसाठी एक ग्रॅम घेणारा व्यक्ती दिवसाला 15 ग्रॅम पर्यंत ड्रग्स घेतो.
ही परिस्थिती जरी असली तरी यातून बाहेर कसं निघायचं असा प्रश्न मात्र, पालकांना आणि कुटुबीयांना पडला आहे. यातून अनेकजण मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.
एकूणच, ड्रग्सच्या संदर्भात कारवाई जरी सुरू असली तरी त्या व्यसनावर मात कशी करायची आणि बळी पडलेल्या तरुणांना यातून बाहेर कसंं काढायचं असा प्रश्न आता पडू लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : गरोदर असून मोकळ्या हवेत फिरत आहात, तर थांबा, वायू प्रदूषणाचा धोका वाढतोय