Taste of Beer: हवामान बदल (Climate Change) धोकादायक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. हवामान बदलाचा आरोग्यासह (Health) इतर गोष्टींवर, खाद्यपदार्थांवरही परिणाम होतो. बरेच जण हवामानात होणारे बदल नाकारत आहेत, पण हेच सत्य आहे.
तुम्ही बिअर (Beer) पित असो किंवा नसो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हवामान बदलामुळे भविष्यात बिअरची चव देखील बदलणार आहे. अलीकडील संशोधनात असं आढळून आलं की, हवामानातील बदलामुळे बिअरवर परिणाम होईल, त्यामुळे ती अधिक महाग होईल आणि तिची चव बदलण्याची देखील शक्यता आहे.
या संशोधनातून झाला खुलासा
हवामानातील बदलामुळे बिअरच्या चवीवर कसा बरं परिणाम होतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पाणी आणि चहा नंतर बिअर हे तिसरं सर्वात लोकप्रिय पेय आहे. तर, जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या अल्कोहोलिक पेयाला त्याची विशिष्ट चव आणि वास हॉप्स नावाच्या फुलापासून मिळतो.पण भविष्यात या फुलांचं उत्पादन कमी होईल आणि त्यामुळे बिअरच्या गुणवत्तेवर देखील हवामान बदलाचा परिणाम होईल, असे द गार्डियनच्या अहवालात म्हटलं गेलं आहे.
भविष्यात बिअरची चव बदलणार
जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असं भाकीत केलं गेलं आहे की, जोपर्यंत शेतकरी उष्ण आणि कोरड्या हवामानाशी जुळवून घेत नाहीत, तोपर्यंत उत्पादन घटण्याची समस्या जाणवता राहील. युरोपच्या वाढत्या तापमानातील प्रदेशांमध्ये 2050 पर्यंत हॉपचं उत्पादन सुमारे 4 ते 18 टक्क्यांनी घसरेल. बिअरची चव बदलण्यास हॉप्समधील अल्फा ऍसिड कारणीभूत असल्याचाही अंदाज लावला गेला आहे. त्यामुळे भविष्यात सध्याच्या चवीच्या तुलनेत 20 ते 31 टक्क्यांनी बिअरची चव घसरेल.
अशा प्रकारेही दिसू शकतो परिणाम
"बिअर पिणार्यांना हवामानातील बदल, त्यामुळे बिअरच्या गुणवत्तेत झालेला बदल आणि किंमतीतील फरकाचा अंदाज नक्कीच लक्षात येईल, असं आमचा डेटा सूचित करतो," असं झेक अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या ग्लोबल चेंज रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ, अभ्यास सह-लेखक मिरोस्लाव त्रन्का म्हणतात. युरोपियन पबमध्ये तर, हवामान आणि राजकारणाव्यतिरिक्त बहुतेक वादविवाद हे बिअरवरुन होत असल्याचंही ते म्हणाले.
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) नुसार, हवामान बदल जरी सर्वांसाठी हानीकारक असला तरी लोकांवर याचा विषम परिणाम होतो. अहवालात असं आढळून आलं आहे की, केवळ एक तृतीयांश राष्ट्रातील स्त्रिया आणि मुलींवर हवामान संकटाचा विषम परिणाम दिसून येतो. हवामानातील बदल आणि आरोग्याशी संबंधित गोष्टींवरही या संशोधनात अभ्यास केला गेला.
हेही वाचा:
Facts: कोण आहे जगातील सर्वात स्मार्ट सीईओ? जाणून घ्या कसं केलं जातं कॅल्क्युलेशन