Diabetes Care Tips : मधुमेहावरील सर्वसमावेशक उपचारपद्धतीमध्ये मधुमेह (Diabetes) असलेल्या व्यक्तींनी योग्य उपचार नियमितपणे घेणे, संतुलित व सकस आहार घेणे आणि नियमित व्यायामाचे वेळापत्रक तयार करणे या गोष्टींची शिफारस केली जाते. शारीरिक व्यायाम हा मधुमेहींच्या देखभालीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. टाइप 1 मधुमेहींच्या बाबतीत स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंगमुळे स्नायू बळकट होतात आणि व्यायाम करताना रक्तातील साखरेची पातळी घसरण्याची शक्यता कमी होते.


अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या म्हणण्यानुसार वजन घेऊन केलेल्या व्यायामामुळेही हाडे बळकट होणे, रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉल कमी होणे, वजन घटणे आणि हृदयविकाराचा धोका कमी होणे यांसारखे अतिरिक्त फायदे मिळतात.


व्यायामामुळे मिळेल नियंत्रण


डायबेटोलॉजिस्ट डॉ. मुदित सभरवाल यांच्या मते, ‘मधुमेहग्रस्त व्यक्तींनी नियमितपणे व्यायाम करणे हे मोठेच आव्हान असते आणि पावसाळ्यात तर त्याकडे सहज दुर्लक्ष होते. रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित राखायची असेल, तर त्यांना घरच्याघरी व्यायाम करण्याचा नियम घालून घेत या दिशेने थोडे प्रयत्न करायला हवेत. सकस आहार आणि नियमित व्यायाम यांच्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तींना त्यांच्या रक्तदाबामध्ये व रक्तातील कॉलेस्ट्रॉलच्या पातळीमध्येही सकारात्मक बदल झालेला दिसून येईल.’


शारीरिक हालचालींमधील सातत्य टिकविण्यासाठी मधुमेहींनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातल्या घरात करायच्या वर्कआऊटचे वेळापत्रक ठरवले पाहिजे. त्यात पुढील काही व्यायाम प्रकारांचा समावेश करता येईल...


वॉल पुशअप्स: भिंतीकडे तोंड करून उभे रहा आणि तळवे खांद्यांच्या रेषेत सरळ ठेवा; प्लॅन्क स्थितीमध्ये उभे राहत व शरीराचा कमरेवरील भाग सरळ ठेवत, हात कोपरामध्ये दुडत आपली छाती भिंतीच्या दिशेने पुढे न्या. हळूहळू पुन्हा मागे जा आणि आपले बाहू सरळ करा


साईड रेझस: हा व्यायाम बसून किंवा उभे राहून करता येईल. प्रत्येक हातामध्ये एक वजन घ्या. हळुहळू दोन्ही बाहू कोपरामध्ये किंचित वाकवत आपापल्या बाजूला वर उचला. बाहू खांद्यांच्या रेषेत येईपर्यंत वर उचला, इंग्रजी ‘T’ आकार बनेल. हळुहळू बाहू पुन्हा खाली न्या व संपूर्ण व्यायाम पुन्हा करा.


चेअर रेझेस: यात खुर्चीवर सरळ बसा. आपले दोन्ही बाहू फुलीच्या आकारात छातीशी दुमडून घ्या आणि मागे झुका. आता आपले बाहू सरळ रेषेत समोर नेत पाठीत ताठ व्हा व उभे रहा. पुन्हा आपल्या बसलेल्या स्थितीत जा व संपूर्ण व्यायाम पुन्हा करा.


बायसेप कर्ल्स: तळवे आतल्या बाजूला असतील अशा प्रकारे हात शरीराच्या बाजूंना सरळ ठेवा व प्रत्येक हातात एक वजन धरा. आता तळवे आपल्या दिशेने वळवा व एक बाहू वाकवत भार खांद्यांकडे न्या. हाच व्यायाम दुसऱ्या हाताने करा आणि मग दोन्ही हात पुन्हा खाली घ्या.


ट्रायसेप एक्स्टेन्शन्स : आपला एक हात डोक्यावर घ्या म्हणजे तुमचे कोपर छताच्या दिशेने वर जाईल, तर जमिनीच्या दिशेने निर्देश करणाऱ्या दुसऱ्या हातामध्ये वजन घ्या. ही हालचाल करताना कोपराला दुखापत होऊ नये यासाठी दुसऱ्या हाताने आपला बाहू स्थिर ठेवा. वजन डोक्याच्या वर नेण्यासाठी आपला बाहू सरळ वर न्या. आणखी एकदा असे करा. आता दुसरा बाहू वापरून हाच व्यायाम पुन्हा करा.


या साध्यासोप्या व्यायामामुळे आपल्या शरीराची एकूणच ताकद वाढण्यास मदत होते व मधुमेहाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते. मात्र कोणता व्यायामप्रकार आपल्याला सर्वाधिक साजेसा ठरेल हे समजून घेण्यासाठी व्यायाम सुरू करण्यासाठी आपल्या डायबेटॉलॉजिस्टचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. वर्क आउट करताना रक्ताची पातळी सातत्याने तपासत रहायला विसरू नका. त्यामुळे व्यायामपद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करता येतील आणि अधिक चांगले तंत्र शोधता येईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.