औरंगाबाद: 'डोळे तुझे जुलमी गडे, मजकडे रोखून पाहू नका' असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे. कारण नागरिक  हैराण आहेत डोळ्याच्या साथीनं. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक लाखापेक्षा अधिक लोक डोळे आल्यानं म्हणजेच डोळ्याच्या आजारानं हैराण आहेत 


महाराष्ट्रात अॅडडिनो व्हायरसमुळे डोळ्याचे रुग्ण वाढले आहेत. पावसाळ्यात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे व्हायरस पसरण्याची आयती संधी मिळते आहे. ओलाव्यामुळे संसर्ग बराच काळ शरीरात राहतो. त्यामुळे आपल्याला वारंवार घाम येतो आणि यामुळे आपण आपला चेहरा पुसत राहतो. चेहरा पुसताना आपण डोळ्यांनाही हात लावत राहतो. या सर्व कारणांमुळे संसर्ग होतो आणि डोळे येण्याची साथ पसरतेय. यामुळे महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंतच्या शासकीय आकडेवारीनुसार जवळपास एक लाख रुग्ण डोळ्याच्या आजाराने त्रस्त आहेत.


डोळे येणे (Conjunctivitis) आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहेत यावर एक नजर टाकूयात


डोळे येण्याची लक्षणे-


1. डोळे लाल होणे.
2. वारंवार पाणी गळणे.
3. डोळयाना सूज येणे.
4. काही वेळा डोळ्यातून चिकट द्रवपदार्थ बाहेरील बाजूस येतो.
5. डोळ्याला खाज येते.
6. डोळे जड वाटतात आणि डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटते.


डोळे आल्यास अशी काळजी घ्या


1. डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे.
2. इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने डोळे पुसू नये.
3. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये.
4. घराबाहेर जाताना गॉगल वापरा.
5. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा.
6. आपल्या सभोवतालाचा परीसर स्वच्छ ठेवावा.
7. शाळा, वसतीगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे.
8. डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने संसर्ग होतो, त्यामुळे नियमीत हात धुवावा.
9. डॉक्टाराच्या सल्यानुसारच औषधं डोळ्यात टाकावी.


छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. शहरात डोळ्याच्या साथीचे 1192 रुग्ण आहेत. काल एकाच दिवसात 286 रुग्ण सापडले. यामुळे मनपा आरोग्य केंद्रात ड्रॉपचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे बाहेरून ड्रॉप मागवले जाणार आहेत.


डोळे आल्यानंतर स्टेरॉईड आय ड्रॉपचा वापर टाळावा, सर्व रुग्णांनी जवळच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र किंवा रुग्णालय येथे सपंर्क साधून उपचार घ्यावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.


महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आहेत यावर एक नजर टाकूया,


बुलडाणा -13,550


पुणे- 8,808


अकोला-6,125


अमरावती- 5,538


धुळे -4,743


जळगाव-4,717


गोंदिया 4,209


या खालोखाल इतर जिल्ह्यात मिळून 31 जुलै पर्यंत जवळपास 88 हजार रुग्ण आहेत तर आजच्या तारखेला एक लाखापेक्षा अधिक रुग्ण डोळ्याच्या आजाराने त्रस्त आहेत. ही केवळ शासकीय रुग्णालयातील आकडेवारी आहे. एखाद्या रुग्णाचे डोळे आल्यास तीन दिवस त्याचा  इफेक्‍ट राहतो असे डॉक्‍टरांनी सांगितले. कंजंक्‍टिव्हायटिस असे या विकाराचे नाव आहे. डोळ्याच्या बाहेरील पडद्यावर जंतूसंसर्ग होतो. या साथीचा फैलाव थाबवण्यासाठी रुगन्नी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, हातापायांची स्वच्छता ठेवावी. डोळ्यात टाकावयाचे ड्रॉप एकमेकांना शेअर करू नयेत. शक्‍यतो संपर्क टाळावा.


ही बातमी वाचा: