Misunderstanding Of Childhood Cancer : कर्करोग (Cancer) हा केवळ प्रौढांमध्ये दिसून येतो, असं नाही तर हा घातक आजार लहान मुलांना देखील आपल्या विळख्यात अडकवतो. मात्र, त्यावर वेळीच उपाय केला, तर कर्करोग बराही होऊ शकतो. नवजात बाळापासून ते 15 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये कर्करोगाचा (Childhood Cancer) सर्वाधिक प्रसार पाहायला मिळतो. तळेगावातील टीजीएच-ऑनको लाईफ कॅन्सर सेंटरमधील एमबीबीएस, एमडी डॉ. सारंग वाघमारे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
बाल कर्करोगाचे प्रकार :
- ल्युकेमिया (Leukemia)
- लिम्फोमा (Lymphoma)
- पाठीचा कण्यातील गाठ
- मूत्रपिंडाची गाठ
- न्यूरोब्लास्टोमास (Neuroblastoma)
- मेंदूतील गाठी
- रेटिनोब्लास्टोमास
- विल्म्स ट्यूमर (Wilms Tumor)
- ऑस्टिओसारकोमा (Osteosarcoma)
बाल कर्करोगाबाबत पालकांमध्ये जागरुकतेचा अभाव असल्यानं त्याचं निदान आणि उपचार करण्यास विलंब होतो. तसेच, या कर्करोगाबाबत असलेले गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. जेणेकरुन वेळीच निदान आणि उपचार शक्य होईल
बाल कर्करोगाबाबत गैरसमज काय?
1. गैरसमज : बाल कर्करोग बरा होऊच शकत नाही आणि मुलाचं आयुष्य वाचविता येत नाही. तसेच, मृत्यू टाळता येत नाही.
प्रत्यक्षात बाल कर्करोगाला नैराश्यानं पाहिलं जातं, परंतु वास्तवात बहुतेक बाल कर्करोगांवर प्रभावी उपचार करता येणं शक्य आहे. उदाहरणार्थ, ल्युकेमियाचा एक प्रचलित प्रकार जिथे 4 पैकी 3 मुलं केवळ केमोथेरपीद्वारे बरी होऊ शकतात. यशस्वी पुनर्प्राप्तीसाठी वेळीच निदान आणि योग्य उपचार महत्वाचे आहेत.
2. गैरसमज : मुलांमधील कर्करोग हा फ्लू सारखा पसरतो आणि तो संसर्गजन्य असतो, तो एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे पसरतो.
हा सर्वात मोठा गैरसमज असून कर्करोग हा संसर्गजन्य आजार नाही. हे एका मुलापासून दुसऱ्या मुलामध्ये पसरत नाही. कर्करोगाने ग्रस्त मुले त्यांच्या कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे व संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क घालतात.
3. गैरसमज : जर कर्करोगातून बरे झाले तर त्यांना यापुढे काळजी घेण्याची आवश्यकता नाही
वास्तविकता बरे झाल्यानंतरही त्यांना फॉलो-अप घेणे गरजेचे आहे. यामागचे कारण म्हणजे त्यांच्या मागील कर्करोगाच्या उपचारांमुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या विकसित होण्याची अधिक शक्यता असते. म्हणून, सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
4. गैरसमज : कर्करोगानं ग्रस्त मुले सामान्य जीवन जगू शकत नाहीत
हा विधान पूरेणपणे चुकीचे असून. कर्करोगाने ग्रस्त मुलांचे त्वरीत निदान व उपचार सुरु झाल्यास ते सामान्य जीवन जगू शकतात आणि उपचारानंतर सामान्य मुलांप्रमाणे शाळेत परत जाऊ शकतात.
बाल कर्करोगाविषयी अनेकजा गैरसमजूती पसरलेल्या दिसून येतात. मात्र त्यामागची वास्तविकता जाणून घेणं आणि चुकीच्या समजूतींना दूर करणं गरजेचं आहे.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :