Liver Cancer: 2020 मध्ये जगभरात लिव्हरच्या कॅन्सरनं (Symptoms Liver Cancer) 9 लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद आढळून आली आहेत. यकृताचा कर्करोग (Liver Cancer) हा पुरुषांमधील पाचव्या क्रमांकाचा जीवघेणा कर्करोग ठरला आहे, तर स्त्रियांमधील नवव्या क्रमांकाचा जीवघेणा कर्करोग ठरत आहे. यकृताचा कर्करोग हा जागतिक स्तरावर कर्करोगाच्या मृत्यूचं एक प्रमुख कारण ठरत आहे, दरवर्षी सात लाखांहून अधिक रुग्णांना यामुळे आपला जीव गमवावा लागतो. 


जागतिक स्तरावरील आकडेवारी पाहता पुढील 20 वर्षांत यकृताच्या कर्करोगाच्या घटना या 55 टक्क्यांपेक्षा अधिक वाढण्याचा अंदाज आहे. याचाच अर्थ असा की, 2040 पर्यंत जगभरात 1.4 दशलक्ष नव्या रुग्णांची आणि यकृताच्या कर्करोगाचे 1.3 दशलक्ष मृत्यू होऊ शकतात. सिऱ्होसिस, क्रॉनिक व्हायरल हिपॅटायटीस, गर्भनिरोधकांचा दीर्घकाळ वापर आणि धूम्रपान करणं यांसारख्या जोखीम घटकांमुळे यकृताच्या कर्करोगाचं प्रमाण जगभरात वाढत चाललं आहे. यासंदर्भात नवी मुंबईतील मेडिकोव्हर हॉस्पिटल्सचे यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया स्पेशालिस्ट डॉ विक्रम राऊत यांनी माहिती दिली आहे. 


लिव्हर कॅन्सर होण्याची कारण 



  • उशीरा निदान: यकृताचा कर्करोग असलेल्या बऱ्याच लोकांमध्ये लक्षणं उशीरा दिसून येतात, ज्यामुळे प्रभावीपणे उपचार करणं कठीण होतं.

  • मर्यादित उपचार पर्याय: यकृताच्या कर्करोगाचं निदान अनेकदा केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीनं करणं शक्य होत नाही. तसेच, सर्वच रुग्ण शस्त्रक्रिया किंवा यकृत प्रत्यारोपणासाठी पात्र ठरत नाहीत.

  • पुन्हा होण्याची भिती : यशस्वी उपचारानंतरही, यकृताचा कर्करोग पुन्हा होऊ शकतो किंवा तो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो.

  • इतर आजार असणं : यकृताचा कर्करोग असलेल्या बऱ्याच लोकांना यकृताचे काही इतर आजारही असतात, जसं की लिव्हर सिरोसिस किंवा हेपिटायटीस, जे त्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.


लिव्हरच्या कर्करोगाचे प्रकार 


प्राथमिक अवस्थेतील लिव्हरचा कर्करोग हा ट्यूमर असतो. जो थेट यकृताच्या पेशींपासून विकसित होतात. हेपटो सेल्युलर कार्सिनोमा (HCC) हा सर्वात सामान्य प्रकार आहे. इतर प्रकारांमध्ये फायब्रोलामेलर एचसीसी, कोलान्जिओकार्सिनोमा आणि अँजिओसारकोमा यांचा समावेश होतो. सेकंडरी किंवा मेटास्टॅटिक, यकृत कर्करोग हे ट्यूमर असे आहेत जे शरीराच्या इतर भागापासू सुरू होतात आण् मग यकृतात पसरतात जसे की कोलन कॅन्सर.


यकृताच्या कर्करोगाची लक्षणं



  • अचानक वजन कमी होणं

  • भूक न लागणं

  • ओटीपोटात दुखणं

  • मळमळणं आणि उलटी होणं

  • अशक्तपणा आणि थकवा येणं

  • ओटीपोटात सूज येणं

  • त्वचेचा रंग पिवळा पडणं आणि तुमच्या डोळ्यांचा रंग देखील पिवळा पडतो (कावीळ)

  • पांढरा, खडूसारखा येणारा मल


यकृताच्या कर्करोगाचे निदान आणि उपचार विविध चाचण्या आणि प्रक्रियांद्वारे केले जातात, कर्करोगाचा प्रकार, टप्पा आणि स्थान, तसेच त्या व्यक्तीचे एकूण आरोग्यावर अवलंबून. 


उपचार कसे कराल? 



  • रक्त चाचण्या : रक्त चाचण्या यकृताच्या कार्यातील विकृती किंवा अल्फा-फेटोप्रोटीन सारख्या यकृताचा कर्करोग दर्शवणाऱ्या विशिष्ट पदार्थांची उपस्थिती दर्शविण्यात मदत करतात.

  • इमेजिंग चाचण्या: इमेजिंग चाचण्या, जसे की अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, एमआरआय आणि पीईटी, हे यकृतातील ट्यूमरचा आकार आणि स्थान तसेच ते इतर अवयवांमध्ये पसरले आहे की नाही हे दाखवितात.

  • यकृताच्या कर्करोगासाठी वेगवेगळे उपचार आहेत, कर्करोगाचा प्रकार, टप्पा आणि त्याचे स्थान यानुसार हे उपचार ठरविले जातात. यकृत शस्त्रक्रिया किंवा यकृत प्रत्यारोपण यासारख्या उपचार पद्धती दीर्घकालीन परिणाम देतात.

  • शस्त्रक्रिया : हे कर्करोगाच्या प्रमाण आणि तुमची यकृताची स्थिती यावर अवलंबून, ट्यूमर किंवा संपूर्ण यकृत काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रियेचा वापर केला जाऊ शकतो.

  • यकृत प्रत्यारोपण : जेव्हा यकृताचा ट्युमर केवळ यकृतापुरता मर्यादित असतो परंतु शोधण्यायोग्य नसतो तेव्हा यकृत प्रत्यारोपण चांगले दीर्घकालीन परिणाम दर्शवितं.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Egg for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रोज खा अंडी; पण कशी, उकडून की तळून?