Ketaki Chitale : मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) अडचणीत वाढ झाली आहे. केतकीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे सध्या तिच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात केतकी चितळेसह निखिल भामरेवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकतेच औरंगाबादमध्ये केतकी चितळेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात भाष्य करणारी आक्षेपार्ह पोस्ट केतकी चितळेने शेअर केली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरातल्या सूतगिरणी चौकात हे आंदोलन करण्यात आलं आहे. दरम्यान केतकी चितळेच्या फोटोवर काळी शाई फेकण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनीदेखील केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली आहे.
केतकी चितळेने ही पोस्ट शेअर केल्यामुळं राष्ट्रवादी पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, केतकी प्रसिद्धीसाठी जन्मदात्यांच्या नावाच्या जागी पवार साहेबांचे नाव वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.
'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेच्या माध्यमातून केतकी घराघरांत पोहोचली होती. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. गेल्या काही वर्षापासून केतकीला अपस्मार हा आजार आहे. या आजारावर केतकी वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे. त्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
संबंधित बातम्या