Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर विखारी टीका करणाऱ्यांना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी ट्वीटरवरून एकाने दिली होती. त्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे हिने पवार यांच्यावर रोख असलेली कविता शेअर केली होती. या कवितेत पवारांच्या आजारपणावरही टीका करण्यात आली आहे. याचे पडसाद उमटू लागले आहेत. 


राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी संघावर निशाणा साधला आहे. केतकी चितळे असेल किंवा शरद पवार यांना जीवे मारण्याबाबत ट्वीट करणारा भामरे असेल. यांना लहानपणी संघाच्या शाखेत जे विषारी बाळ कडू मिळालं त्याची उदाहरणे असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. हे सगळं घडवून आणण्याचं काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होतं आहे. त्यांनी गावा गावात 25-25 हजार रुपये पगार देऊन ट्रोलर्स नेमले आहेत. त्याच्या माध्यमातून अशाप्रकारे विष पसरवण्याचा प्रयत्न होतं असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला. 


राष्ट्रवादी युवती काँग्रेच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनीदेखील अभिनेत्री केतकी चितळेवर टीका केली. केतकी चितळे सारख्या विकृतींना  संघाच पाठबळ असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सातत्याने शरद पवार यांच्याविरोधात खालच्या पातळीवर टीका सुरू असल्याचा आरोप सक्षणा सलगर यांनी केला. मालिका दिग्दर्शक निर्मात्यांनी अशा विकृतींना थारा देता कामा नये. अन्यथा आम्हाला वाहिनीवरील बहिष्कारासोबतच कार्यक्रमही उधळून लावावे लागतील असा इशाराही सलगर यांनी दिला आहे.  


राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेत्री केतकी चितळेवर टीका केली आहे. केतकी इतकी विकृत असेल असे वाटले नव्हते. तिने काय लिहिले आहे हे जरा वाचा आणि तुमच्या आजोबां बद्दल वडिलांबद्दल असा कोणी लिहिलं तर काय वाटेल याचाही विचार करा असे आवाहनही आव्हाड यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटील हे शरद पवारांवर राजकीय टीका करतात. त्याला आम्हीदेखील उत्तरं देतो. शरद पवारांवर राजकीयदृष्ट्या नक्की टीका करा. मात्र, त्यांच्या आजारपणावरून टीका करत असाल आणि आमच्या कार्यकर्त्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्यास तुम्हाला काही बोलता येणार नसल्याचेही आव्हाडांनी सांगितले. जीवे मारण्याची धमकी देऊन, विखारी टीका करून उंदिरासारखे का पळून जाताय असा सवालही आव्हाड यांनी केला.


ब्राह्मण्यवादाला विरोध


भारतामध्ये अनेक ब्राह्मणांनी ब्राह्मण्यवादाला विरोध केला होता. यामध्ये ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद डांगे, मृणाल गोरे, पंडित नेहरू यांच्यासोबत असणारे काकासाहेब गाडगीळ, हे सगळे ब्राम्हण होते. त्यांनी ब्राह्मण्यवादाला कायम विरोध केला. त्यांनी ब्राह्मण समुदायाला विरोध केला नसल्याचेही आव्हाड यांनी म्हटले. ब्राह्मण्यवादाला कडाडून विरोध केलाच पाहिजे असेही आव्हाड यांनी म्हटले.