Holi 2023: होळी (Holi 2023) हा रंगांचा सण जवळ आला आहे. हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. अनेक जण हा उत्सव भाज्या, वनस्पती आणि फुलांपासून बनवलेले नैसर्गिक रंग लावून साजरा करतात. परंतु सध्या, होळीसाठी वापरण्यात येणारे रंग हे रसायनांपासून (केमिक्स) बनवले जातात. हे रंग आरोग्यास हानिकारक असतात. त्यामुळे अनेकांना डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. रंगाची पावडर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे  पदार्थ हे एस्बेस्टोस, खडूंची भुकटी, सिलिका इत्यादी पासून बनवलेले असतात. त्यानंतर इंजिन तेल किंवा निकृष्ट दर्जाच्या तेलांमध्ये हे रंग मिसळून रंगीत पेस्ट तयार केल्या जातात.  हे सर्व रासायनिक पदार्थ त्वचा, डोळे आणि श्वसनसंस्थेसाठी हानिकारक असतात. आरजे सनकारा नेत्र रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) आणि कॉर्निया सल्लागार गिरीश एस बुधराणी यांनी होळी दरम्यान आरोग्याची कशी काळजी घ्यायची? याबद्दल सांगितले आहे. 


रंगांमुळे डोळ्यांना जाणवू शकतात 'या' समस्या 


जेव्हा रंग डोळ्यांच्या संपर्कात येतात तेव्हा डोळ्यांना एलर्जी होऊ शकते. डोळ्यांच्या पापणीला आतून सूज येणे, डोळ्याची आग होणे, इत्यादी समस्या तुम्हाला होळीत लावल्या जाणाऱ्या रंगामुळे जाणवू शकतात. केवळ रंगच नाही तर रंग एकमेकांना लावण्यासाठी जाणार्‍या पिचकारीसारख्या वस्तू आणि पाण्याचे फुगे फोडल्याने देखील डोळ्यांना इजा होऊ शकते. 


होळी खेळताना डोळ्यांची काळजी घेण्यासाठी 'या' काही टीप्स फॉलो करा:
1. होळी खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर करा. 
2. होळी खेळताना गॉगल घाला. 
3. केसांवर टाकलेले रंगीत पाणी डोळ्यांमध्ये जाऊ नये, यासाठी केस बांधा किंवा टोपी घाला.
4.  एखादी व्यक्ती तुम्हाला रंग लावत असेल तर डोळे बंद करा.
5. डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स घालून कधीही होळी खेळू नका कारण अशानं रंग डोळे आणि लेन्समध्ये अडकतात, ज्यामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. 
6. जर रंग किंवा रंग मिक्स केलेलं पाणी डोळ्यांत गेले तर डोळे चोळू नका. लगेच स्वच्छ पाण्याने फक्त डोळे धुवा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Holi 2023 : होळीत रंगांची उधळण करताना सावधान; 'या' रंगांमुळे दमा, त्वचेच्या रुग्णांच्या वाढू शकतात समस्या