Alzheimer's Disease and Dementia: स्मृतिभ्रंश (Dementia) हा एक असा आजार आहे, ज्यामुळे माणसाची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती हळूहळू कमी होते किंवा संपते. स्मृतिभ्रंशामुळे व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर खूप वाईट परिणाम होतो आणि तो गोष्टी विसरायला लागतो. याशिवाय या आजारामुळे माणसाला दैनंदिन कामं करण्यातही खूप समस्या येतात. वाढत्या वयाबरोबर ही समस्या आणखी वाढू लागते. सामान्यतः 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना डिमेंशियाचा (Dementia Symptoms) सर्वाधिक धोका सहन करावा लागतो. मात्र चीनमध्ये (China) नुकतंच एक नवं प्रकरण समोर आले आहे. यामुळे शास्त्रज्ञांचीही झोप उडाली आहे.
Alzheimer : सर्वात तरुण अल्झायमरचा रुग्ण
चीनमध्ये (China News) राहणाऱ्या एका 19 वर्षीय मुलाला वयाच्या सतराव्या वर्षापासूनच विसरण्याचा आजार जडला होता. त्यासाठी त्याच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीअंती त्याला स्मृतिभ्रंश झाल्याचं निष्पन्न झालं. अलीकडेच जर्नल ऑफ अल्झायमर डिसीजमध्ये प्रकाशित झालेल्या एका केस स्टडीमधून हे उघड झालं आहे. अनेक चाचण्यांनंतर बीजिंगमधील (Beijing) कॅपिटल मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी भीती व्यक्त केली आहे की, या मुलाला अल्झायमर आहे आणि हे सिद्ध झाल्यास हा मुलगा अल्झायमरचा (Alzheimer Disease) सर्वात तरुण रुग्ण असेल.
अल्झायमरच्या (Alzheimer's Disease) नेमक्या कारणांबद्दल अद्याप फारशी माहिती उपलब्ध नाही, परंतु मेंदूमध्ये दोन प्रथिने तयार झाल्यामुळे हा आजार या होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बीटा-अमायलोइड आणि टाऊ (TAU) या प्रथिनांमुळे अल्झायमर निर्माण होत असल्याचं बोललं जातं. सामान्यत: अल्झायमरच्या रुग्णांमध्ये, न्यूरॉन्सच्या (मेंदूच्या पेशी) बाहेरील बाजूस बीटा-अॅमायलॉईड मोठ्या प्रमाणात आढळतात आणि ताऊचे 'गुंठ' अॅक्सन्सच्या आत आढळतात.
सदोष जनुक हे अल्झायमरचे मुख्य कारण
चाचणीदरम्यान संशोधकांनी या 19 वर्षीय मुलाच्या मेंदूचं स्कॅनिंग केलं. यावेळी त्यांच्या मेंदूमध्ये ही लक्षणं आढळून आलेली नाहीत. परंतु स्कॅनमध्ये मुलाच्या सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडमध्ये p-tau181 नावाच्या प्रोटीनची असामान्य उच्च पातळी दिसून आली, जी सामान्यत: मेंदूमध्ये टँगल्स तयार होण्यापूर्वी उद्भवते.
30 वर्षांखालील लोकांमध्ये अल्झायमरची जवळजवळ सर्व प्रकरणं अनुवंशिक मिळालेल्या सदोष जनुकांमुळे असतात. खरं तर, याआधीही, 21 वर्षांच्या मुलामध्ये अल्झायमरची लक्षणं आढळली होती, ज्याचे मुख्य कारण देखील दोषपूर्ण जीन्स होते.
तरुणांमधील अल्झायमर रोग 3 जीन्सशी संबंधित आहे - amyloid precursor protein (एपीपी), प्रीसेनिलिन 1 (पीएसईएन1) आणि प्रीसेनिलिन 2 (पीएसईएन2). हे जीन्स बीटा-अॅमिलॉइड पेप्टाईड नावाच्या प्रथिनाच्या निर्मितीमध्ये गुंतलेली असतात. जर जनुक दोषपूर्ण असेल, तर अशा स्थितीत मेंदूमध्ये बीटा-अॅमिलॉईड असामान्यपणे जमा होऊ लागते. अल्झायमर रोग विकसित करण्यासाठी लोकांना फक्त APP, PSEN1 किंवा PSEN2 पैकी एक आवश्यक आहे. अल्झायमर असलेल्या लोकांच्या मुलांना त्यांच्याकडून जनुक वारसा मिळण्याची आणि तसेच हा आजार होण्याची शक्यता 50-50 असते.
संशोधकांनी अनुवांशिक कारणं नाकारली
दरम्यान, या नव्या प्रकरणात अनुवांशिक कारण संशोधकांनी नाकारलं आहे. मुलाच्या संपूर्ण-जीनोम सीक्वेंसचा अभ्यास केला आणि कोणतेही अनुवांशिक बदल संशोधकांना दिसून आलेलं नाही. याशिवाय या मुलाच्या कुटुंबात अल्झायमर रोग आणि स्मृतिभ्रंशाची कोणतीही प्रकरणं आढळून आली नाही. तसेच, या मुलाला इतर कोणताही आजार, संसर्ग किंवा ट्रॉमाही बसलेला नव्हता. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट होतं की या मुलामध्ये दिसत असलेली अल्झायमरची लक्षणं फारच दुर्मिळ आहेत.
वयाच्या सतराव्या वर्षी, मुलाला त्याच्या शालेय अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात समस्या येऊ लागल्या. एक वर्षानंतर त्याची शॉर्ट टर्म मेमरीही हळूहळू कमी होऊ लागली. हळूहळू त्याची स्मरणशक्ती इतकी कमी झाली की, त्याला शाळा सोडावी लागली.
यानंतर या मुलाच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या आणि या सर्व चाचण्यांचे निकाल पाहता अल्झायमरचा आजार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्याची स्मरणशक्ती खूपच कमकुवत झाल्याचंही चाचण्यांमधून निष्पन्न झालं आहे. यावेळी मुलाच्या मेंदूचं देखील स्कॅन करण्यात आलं. ज्यामध्ये त्याचा हिप्पोकॅम्पस-मेमरीमध्ये गुंतलेला मेंदूचा एक भाग - संकुचित झाल्याचं दिसून आलं. जे डिमेंशियाचे प्रारंभिक लक्षण आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
नाकात बोटं घालताय? 'हा' गंभीर आजार बळावू शकतो, संशोधनातून धक्कादायक खुलासा