Holi 2023 : होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. जगभरात होळीचा (Holi 2023) सण अगदी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. पुढच्या महिन्यात 6 मार्च रोजी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. तर, 7 तारखेला धुलिवंदन आहे. होळीमध्ये होलिका दहन केलं जातं. तसेच, आवर्जून रंगांची उधळण केली जाते. मात्र, रंगांची उधळण करत असताना आरोग्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून नेहमी दिला जातो. मात्र, अनेकजण नैसर्गिक रंगांचा वापर न करता रासायनिक रंगांपासून होळी खेळण्याला प्राधान्य देतात आणि अनेक आजारांचे बळी ठरतात.
दम्याचा त्रास असल्यास सावधान
रासायनिक रंगांचा वापर केल्याने आधीच दमा असलेल्या लोकांचं आरोग्य बिघडू शकतं. अनेक प्रकारची रसायने आहेत, जी श्वसनमार्गामध्ये जाऊन संसर्ग वाढवू शकतात. यामुळे दम्याचा झटका येऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला छातीत जड वाटत असेल, श्वासोच्छवासाचा त्रास, खोकला आणि कमी ऑक्सिजनची पातळी यांसारखी लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांना भेटा. तर, ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे. त्यांनी त्यांच्यासोबत इनहेलर ठेवावे.
बुरशीजन्य संसर्गाचा त्रास होऊ शकतो
असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या शरीरावर बुरशीजन्य संसर्ग होतो. रासायनिक रंगांमुळे ही समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, लाल पुरळ उठणे, जळजळ होणे अशी लक्षणे दिसू शकतात. यामुळे समस्या वाढू शकते.
सोरायसिसमध्ये समस्या वाढू शकतात
सोरायसिस (Psoriasis) हा त्वचेचा गंभीर आजार मानला जातो. सोरायसिसमध्ये, संबंधित व्यक्तीच्या त्वचेवर डाग असतात. अंगावर लाल पुरळ उठतात. होळीमध्ये वापरण्यात येणाऱ्या रासायनिक रंगांमुळे सोरायसिसची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. सोरायसिसच्या रुग्णांनी रासायनिक रंगांची होळी खेळणे टाळावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तुम्ही जर या वर्षी होळी खेळणार असाल तर त्वचेची आणि आरोग्याची योग्य काळजी घ्या. कारण होळीतील रंगांचा तुमच्या शरीर, त्वचा, केसांवर आणि एकंदरीतच संपूर्ण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक रंगांचा वापर करण्यावर भर द्या असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :