Swine Flu: स्वाईन फ्लूनं (Symptoms of Swine Flu) पुन्हा एकदा जगासह महाराष्ट्राची (Maharashtra News) धडधड वाढवली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar District) डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूची (African Swine Flu) लक्षणं आढळून आली आहेत. तर, स्पेनमध्ये (Spain) स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून (World Health Organization) अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नंदुरबारमध्ये डुकरांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं आढळून आल्यानं खळबळ पसरली आहे. गेल्या आठवड्यात शहादा तालुक्यातील म्हसावदमध्ये शंभरहुन अधिक डुकरांचा अचानक मृत्यू झाला होता. पशुसंवर्धन विभागानं भोपाळच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवले होते. यामध्ये डुकरांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. अहवाल येताच प्रशासनानं म्हसावद आणि लगतचे दहा किलोमीटर क्षेत्र केले प्रतिबंधीत घोषीत केलं आहे. या परिसरातील डुक्कांराची शास्त्रोक्त पद्धतीनं किलींग प्रक्रीया आजपासून सुरू केली जाणार आहे. या आजाराचा मानवी जीवनावर काही परिणाम होणार नसला तरी, याची लागन झालेल्या डुकांराचा मृत्युदर शंभर टक्के आहे.
स्पेनमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णाची नोंद
स्पेनमध्ये एका व्यक्तीला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं, त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा दिला आहे. 29 जानेवारी 2024 रोजी स्पेनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी WHO अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. स्पेनमध्ये इन्फ्लूएंझा A (H1N1) व्हायरसच्या संसर्गाची तिसरी घटना आहे. स्पेनमध्ये पहिलं प्रकरण 2008 मध्ये नोंदवण्यात आलं होतं. तर दुसरं प्रकरण जानेवारी 2023 मध्ये नोंदवलं गेलं होतं.
स्वाईन फ्लूबाबत WHO कडून अलर्ट जारी
डब्ल्यूएचओनं सांगितलं की, रुग्ण एक प्रौढ पुरुष आहे, जो लेइडा प्रांतातील डुक्कर फार्मवर काम करत होता. त्याच्यात लक्षणं आढळून आल्यानं त्याची चाचणी करण्यात आली. तपासणीत त्याला स्वाईन फ्लू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. डब्ल्यूएचओ म्हणतंय की, इन्फ्लूएंझा A (H1N1) व्हायरसच्या संसर्गाची बहुतेक प्रकरणं स्वाइन इन्फ्लूएंझा व्हायरसच्या थेट संपर्कात आल्यामुळे होतात किंवा ते संक्रमित डुकरांच्या संपर्कात आल्यानं होतात.
स्वाईन फ्लू आणि इन्फ्लूएंझा ए (H1N1) म्हणजे काय?
स्वाईन फ्लू एक संसर्गजन्य श्वसन रोग आहे, जो सामान्यतः डुकरांना प्रभावित करतो. इन्फ्लुएंझा ए (H1N1) व्हायरस हे त्याचं मुख्य कारण असल्याचं म्हटलं जातं. स्वाईन फ्लू हा सामान्य लोकांमध्ये आढळत नाही, परंतु संक्रमित डुकरांच्या संपर्कात आलेल्या लोकांमधून पसरतो.
स्वाईन फ्लूची लक्षणं काय?
- ताप येणं, अंगदुखी
- घशात खवखव आणि वेदना होणं
- सर्दी खोकला
- डोकेदुखी
- स्नायू दुखणं
- डोळ्यांतून पाणी येणं
- धाप लागणं
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
How to Cure Piles: पाईल्सचा त्रास औषधाविनाच ठीक होईल, पण कसा? जाणून घ्या सविस्तर