Health Tips : यशाच्या धावणाऱ्या या जगात कुणाकडेच आपल्या आरोग्याकडे (Health) लक्ष द्यायला वेळ नाही. प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता लागलेली असते. यामुळे अनेकांना लहान वयातच बिपी (Blood Pressure), शुगरच्या (Diabetes) समस्या भेडसावत आहेत. आजारांपासून दूर राहण्याची आणि तंदुरुस्त राहण्याची काळजी आजकाल बहुतांश लोक करत नाही. 'आरोग्य हीच संपत्ती' ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण त्याची अंमलबजावणी कशी करायची हे नेहमीच त्रासदायक ठरले आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळत नसल्यास एक सोपा उपाय सांगणार आहोत, जेणेकरून तुमच्या समस्या कमी होऊ शकतात. चला तर जाणून घेऊयात...


रक्तदाब वाढणे, तणाव, वजन वाढणे आणि पोट फुगणे, शरीरातील साखर वाढणे, या समस्यांचा सध्या केवळ वृद्धच नाही तर तरुणांनाही सामना करावा लागत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्या शरीराविषयी जागरूक नसणे होय. हा काही मोठा आजार नाही. या सर्व समस्यांचा थेट संबंध अनावश्यक तणाव आणि थोडा निष्काळजीपणा यांच्याशी आहे. तथापि, हे टाळण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. थोडेसे चालत गेल्याने चिंता आणि तणाव कमी होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.


दिवसातून किमान 20 मिनिटं चालणे


याबाबत हार्वर्ड मेडिकल स्कूलने 2023 मध्ये एक संशोधन केले आहे. त्यानुसार, दिवसातून किमान 20 मिनिटे चालले की, 14 टक्क्यांपर्यंत ताण आणि चिंता कमी होऊ शकते. इतर अनेक संशोधनांनुसार, चालणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या मते, चालणे हा एक प्रकारचा 'मूड बूस्टर' आहे.


चालण्याचे फायदे पुढीलप्रमाणे 


चालण्याने रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन वाढते. बऱ्याच तज्ञांचा असा विश्वास आहे की, नियमित चालणे हे चिंता आणि तणावावर उपचार करण्यासाठी 'अँटी-डिप्रेसंट' जितके प्रभावी आहे. संशोधकांना असे आढळून आले की, 20-30 मिनिटे चालल्याने शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. चालण्याने रक्त प्रवाह आणि शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. चालण्याचे हृदयासाठी प्रचंड फायदे आहेत. चालण्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलमधील घट होते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. 


चालण्यासाठी वेळ कसा काढणार ? 


जर तुम्ही घराजवळील बाजारात जात असाल तर कारने जाण्याऐवजी पायी जाण्याचा पर्याय निवडा. लिफ्टऐवजी, तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करा. ऑफिसमध्ये संध्याकाळचा चहा घेण्यासाठी तुम्ही थोडे अंतर चालूनही जाऊ शकतात. जर तुम्हाला बाहेर फिरायला जाता येत नसेल तर तुम्ही घराच्या गच्चीवर किंवा बागेतही फिरू शकतात. तुम्ही तुमच्या व्यस्त दिनचर्येमध्ये दररोज किमान 20 मिनिटे चालण्याची सवय लावली तर तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता, असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


 


आणखी वाचा 


एखादी वस्तू उचलताना खांदे दुखतात? खांद्याच्या संधिवातात प्रचंड होतात वेदना, डॉक्टरांनी सांगितला यावर उपाय म्हणाले..


Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator