Irritable bowel syndrome : इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) हा एक सामान्य विकार आहे. जो मोठ्या आतड्याला प्रभावित करतो. या विकारात काही लक्षणं तुम्हाला दिसू लागतात. ज्यामध्ये ओटीपोटात दुखणे, पोटात गोळा येणे, गॅस आणि बद्धकोष्ठता किंवा दोन्हींचा समावेश असतो. IBS ही एक जुनाट स्थिती आहे जी तुम्हाला दीर्घकाळ जाणवू शकते. IBS असणा-या काही लोकांमध्येच गंभीर चिन्हे आणि लक्षणे असतात. काही लोक आहार, जीवनशैली आणि तणाव यांची योग्य मांडणी करून यावर नियंत्रण मिळवू शकतात. ज्यांना या विकाराचा जास्तच त्रास होत असेल त्यांनी वेळीच डॉक्टरांचे उपचार घेणे गरजेचे आहे. 


या आजाराची नेमकी लक्षणं कोणती ?  


हा आजाराची सुरुवात तरूणाईतच होते. वयाच्या 45 नंतर या आजाराची सुरूवात होताना क्वचितच आढळते. अर्थात, प्रौढ आणि वृद्धांनासुद्धा आयबीएसचा त्रास होत राहतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या आजाराची लागण अधिक होते. आयबीएसच्या रुग्णांचे दोन प्रमुख प्रकार. एकात रुग्णांना पोटदुखीच्या त्रासाबरोबर जुलाब आणि मलावरोध याचा त्रास होतो, तर दुसऱ्या प्रकारात पोट न दुखता केवळ जुलाब होत राहतात.


ओटीपोटात, पोटात उजवीकडे आणि डावीकडे, वरच्या पोटात दुखते. पोट अधुनमधून दुखते. पोटात कळ येते. कधीकधी सतत सौम्य वेदना असतानाच एकदम जोरात कळ येते. काहीही खाल्ल्यानंतर वेदना वाढते, मानसिक ताणांमुळे दुखणे अधिक जाणवते. शौचाला गेल्यावर पोट दुखण्यात उतार पडतो. स्त्रियांना मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा पाळी चालू असताना हे त्रास वाढतात. मलावरोध आणि वाढलेली मलप्रवृत्ती ही दोन्ही आयबीएसची प्रमुख लक्षणे आहेत. 


या आजारावर उपाय काय ? 


भाताची पेज, अधिक पिकलेली केळी, बिया काढून राहिलेला पेरूचा गर, उकडलेले सफरचंद, डिंक यात असा विरघळणारा तंतू मोठ्या प्रमाणात असतो. तंतूमध्ये पाण्याचे रेणू राहतात. त्यामुळे, मलावरोध होत नाही. औषधांमध्ये पोटात कळ येऊ नये, अशी औषधे वापरली जातात. ज्या रुग्णांना जुलाब होतात त्यांना जुलाब थांबविण्याची औषधे दिली जातात. परंतु, या उपचारांचा वापर काळजीपूर्वक करावा लागतो.


बहुतेक व्यक्तींना मिरचीचे तिखट, लवंग, कच्चा कांदा, लसूण, पालेभाज्या, कॉफी, साखर, वाटाणा, पावटा, हरभरा, डाळी, उसळी, कोबी अशा पदार्थांच्या सेवनाने कमी-जास्त त्रास होतो. आपल्याला जो पदार्थ पचत नाही, तो टाळणेच इष्ट असते, हा उपचारातील सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. तरी मात्र, ज्यांना या विकाराचा जास्तच त्रास होत असेल त्यांनी वेळीच डॉक्टरांचे उपचार घेणे गरजेचे आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :