Nutrition For Women Health : वाढत्या वयोमानानुसार शरीराला अधिक जीवनसत्त्व आणि खनिजांची गरज असते. विशेषत: महिलांमध्ये चाळीशीनंतर अनेक पोषक तत्वांची कमतरता भासते. याचं मुख्य कारण म्हणजे महिलांच्या खाण्यापिण्याच्या सवयीत होणारे बदल. शरीरात होणारे शारीरिक बदल तसेच आरोग्याबाबत निष्काळजीपणा या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. मुलं झाल्यानंतर हार्मोन्समध्ये होणारे बदल, तसेच आहाराकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महिलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत जाते. यासाठी योग्य वयातच महिलांनी योग्य आहार घेतला पाहिजे. यासाठी शरीराला काही व्हिटॅमिन्सची गरज असते. महिलांनी कोणत्या व्हिटॅमिन्सचे सेवन केले पाहिजे हे जाणून घ्या. 

  


महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक जीवनसत्व : 


1. व्हिटॅमिन डी : वाढत्या वयात महिलांना हाडांशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत महिलांनी व्हिटॅमिन डी (Vitamin D) आणि कॅल्शियम युक्त आहार घेणे आवश्यक आहे. यामुळे सांधेदुखी आणि पाठदुखीमध्ये आराम मिळेल. यासाठी महिलांनी आहारात दूध, चीज, मशरूम, सोया, बटर, ओटमील, फॅटी फिश, अंडी यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. 


2. व्हिटॅमिन सी : स्त्रिया खाण्या-पिण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. चाळीशीनंतर तुम्ही आहारात व्हिटॅमिन सी (Vitamin C) समृद्ध आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी लिंबू, संत्री, हिरव्या भाज्या, आवळा यांसारख्या गोष्टी खाव्यात.


3. व्हिटॅमिन ई : वाढते वय काही वेळा महिलांच्या चेहऱ्यावर दिसून येते. अशा स्थितीत महिलांनी व्हिटॅमिन ई (vitamin E) असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. व्हिटॅमिन ई तुमची त्वचा, केस आणि नखे निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे सुरकुत्या, डाग येण्याची समस्याही दूर होते. व्हिटॅमिन ई साठी तुम्ही बदाम, शेंगदाणे, लोणी आणि पालक यांचे सेवन करावे. 


4. व्हिटॅमिन ए : महिलांना 40-45 वर्षांमध्ये रजोनिवृत्तीतून जावे लागते. अशा परिस्थितीत हार्मोनल बदल देखील होतात. काही वेळा त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही दिसून येतो. अशा वेळी महिलांनी ‘अ’ जीवनसत्त्वाचा आहार घ्यावा. व्हिटॅमिन ए (Vitamin A) साठी तुम्ही गाजर, पपई, भोपळ्याच्या बिया आणि पालक खाऊ शकता. 


5. व्हिटॅमिन बी : महिलांनी वाढत्या वयात व्हिटॅमिन बी (Vitamin B) युक्त आहार घेणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. गर्भधारणेदरम्यान महिलांसाठी व्हिटॅमिन बी 9 खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही बीन्स, धान्य, यीस्ट यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :