Health Care: बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होणं सामान्य आहे. या सगळ्याशिवाय बदलत्या हवामानात संसर्गजन्य तापाचा (Viral Fever) धोका खूप जास्त राहतो. अशा वेळी, आपण स्वतःचं संरक्षण करणं आणि स्वत:ची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. तुमची प्रतिकारशक्ती मजबूत राहिल्यास तुम्हाला व्हायरल आजार जडणार नाहीत. बदलत्या हवामानामुळे होणारे आजार टाळायचे कसे? हा सर्वात मोठा प्रश्न असतो. ताप (Fever) टाळण्यासाठी काय करावं? ताप जर आलाच तर काय खावं? ताप आला तर आंघोळ करावी की नाही? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात.


संसर्गजन्य ताप सारखा का येतो?


पावसाळा ऋतुत संसर्गजन्य तापाची प्रकरणं दुप्पट वेगाने वाढतात. संपर्कातील एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास दुसऱ्या व्यक्तीलाही त्याची लागण होते. कधी एखाद्याला ताप आला तर तो ठराविक कालावधीनंतर सतत येत राहतो. ज्याची प्रतिकारशक्ती कमकुवत असते, अशा व्यक्तीला वारंवार संसर्गजन्य तापाचा धोका असतो. हे विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध लोकांमध्ये दिसून येतं, या पावसाळ्यात या लोकांना सतत ताप येतो. थंड वातावरणामुळे सतत ताप येत राहतो.


ताप आला असताना आंघोळ करावी की नाही?


सर्वात मोठा प्रश्न म्हणजे संसर्गजन्य ताप असताना आंघोळ करावी की नाही? तर जेव्हा तुम्हाला व्हायरल फिव्हर येतो, त्यावेळी स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जितके स्वच्छ असाल तितक्या लवकर तुम्ही बरे व्हाल. जर तुम्हाला व्हायरल फिव्हर असेल तर तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ केली पाहिजे. आंघोळ केल्यास तुम्हाला अधिक फ्रेश वाटेल.


ताप असताना घरी बसून औषध घेणं योग्य की अयोग्य?


तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, व्हायरल ताप आल्यास घरी बसून मेडिकलमधून औषधं आणून घेऊ नये. तर एकदा डॉक्टरांकडे देखील जाऊन यावे, डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा. स्वत:च मेडिकलमधून गोळ्या आणून बरं होण्याचा प्रयत्न केल्यास ताप बराच काळ राहू शकतो.


ताप लवकर जाण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही गरम पाणी, आल्याचा चहा, काढा पिऊ शकता आणि वाफ घेऊ शकता. या घरगुती उपायांनी तुम्हाला बरं वाटेल, पण त्यामुळे ताप कमी होणार नाही. अशा परिस्थितीत चांगल्या उपचारांची गरज असते, त्यामुळे स्वत: स्वत:वर उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.


हेही वाचा:


Health Tips: मस्त चव घेऊन खाताय लोणचं? तर सावधान, अतिसेवनाने 'या' आजारांना पडाल बळी