H3N2 Influenza Virus Cases in Mumbai : सध्या देशात H3N2 विषाणूचा (H3N2 Virus) संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्येही या विषाणूने डोकं वर काढलेय. मुंबई आणि पुण्यासह इतर महत्वाच्या शहरांमध्ये H3N2 विषाणूचा (H3N2 Virus) संसर्ग वाढत आहे. मार्च महिन्यातील 15 दिवसांत मुंबईमध्ये H3N2 विषाणूच्या 53 रुग्णांची नोंद झाली आहे. तर जानेवारी ते मार्च या 75 दिवसात H3N2 चे 118 रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, अद्याप एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत H3N2 विषाणूच्या 32 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी चार रुग्ण एच३एन२ तर 28 रुग्ण एच१एन१ चे आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. वॉर्ड ई, डी, एफएस, एफएन, जीएस, आणि जीएन हायरिस्क झोन या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक आहे. सर्व बीएमसी दवाखाने, 17 डिस्पेन्सरी, 5 वैद्यकीय महाविद्यालये आणि कस्तुरबा रुग्णालयात 24 तासांच्या आत ताप कमी होत नसल्यास सर्व संशयित रुग्णांवर ओसेल्टामिवीरने उपचार केले जात आहेत.
सर्व खाजगी प्रॅक्टिशनर्सना मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली गेली आहे. जर 24 तासांच्या आत ताप कमी झाला नाही तर चाचण्यांच्या निकालांची वाट न पाहता Oseltamivir हे औषध ताबडतोब सुरू केले जावे, असे पालिकेनं सांगितलं आहे. Oseltamivir मुंबईतील सर्व महापालिका रुग्णालये, दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रसूतीगृहांमध्ये मोफत उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे.
H3N2 या विषाणूचं घरोघरी जात आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्व्हेक्षण सुरु आहे. ताप असलेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं जात असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, शिंकताना आणि खोकताना नाक झाकणे, अशा प्रतिबंधाच्या पद्धतींची माहिती देण्यासाठी पोस्टर्स, आरोग्यविषयक चर्चा, लघुपट, सार्वजनिक ठिकाणी माईकवरील घोषणा इत्यादींच्या मदतीने आरोग्य जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. ताप, घसादुखी, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
पुण्यात नवीन H3N2 व्हेरियंटचे 22 रुग्ण आढळले
H3N2 या विषाणूमुळे बाधित झालेले रुग्ण आढळले असल्याने पुणेकरांवर काळजी घेण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत पुण्यात H3N2 या विषाणूचे 22 रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते मार्च या दरम्यान पुणेकरांना बाधा झाली आहे. त्यामुळे आता पुण्यात पुन्हा मास्क लावून फिरायची वेळ येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वाधिक रुग्ण 19 ते 60 या वयोगटातले आहेत. (Maharashtra News) याबाबत एनआयव्हीने तसा अहवाल दिला आहे.