Gooseberry Benefits to Prevent Coronavirus : जगभरात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराच्या BF.7 या (Omicron BF.7) सबव्हेरियंटचा वेगाने प्रसार होत असल्याचं दिसत आहे. जीन, जपान, ब्राझील, दक्षिण कोरियामध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. भारतातील सध्याची कोरोनाची परिस्थिती दिलासादायक असली तरी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपली योग्य काळजी घेणे आणि रोगप्रतिकार शक्त वाढवणे हे फार आवश्यक आहे. 
 
कोरोनाच्या BF.7 व्हेरियंटने (Omicron BF.7) जगाची चिंता वाढवली आहे. जगभरात या व्हेरियंटबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकार्‍यांच्या मते, BF.7 हा कोविड 19 विषाणू हा आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार आहे. भारतातही आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. अन्यथा देशातही कोरोनाचा पुन्हा फैलाव होण्यास वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी सतर्क राहायला हवे. 


कोणताही विषाणू संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत असल्यास अनेक आजार टाळता येतात. त्यामुळे कोरोनाशी दोन हात करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत होईल, अशा गोष्टींचा आहारात समावेश करा. आवळा हा यावरील रामबाण उपाय म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.आवळी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. तुम्हाला कोविड-19 च्या नवीन व्हेरियंटपासून लढण्यात आवळ्याचा वापर कसा करता येईल. येथे वाचा सविस्तर.


आवळ्याचे फायदे


आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट घटक, लोह, फ्लेव्होनॉइड्स, पोटॅशियम आणि अँथोसायनिन घटक भरपूर प्रमाणात आढळतात. अनेक गुणधर्मांनी युक्त आवळ्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. आपल्या आरोग्यासोबतच आपले केस, डोळे आणि त्वचेसाठीही आवळा अतिशय फायदेशीर आहे.


आवळ्याचे सेवन कसं कराल?


आवळा चटणी


आवळा चटणी चवीला खूप चविष्ट असते. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता. यामुळे जेवणाची चव तर दुप्पट होईल, शिवाय आरोग्यासाठीही हे लाभदायक ठरेल.


आवळा लाडू


थंडीच्या मोसमात आवळ्याचा लाडूही अनेक घरांमध्ये उपलब्ध असतो. सकाळी लवकर उठल्यावर रिकाम्या पोटी आवळ्याचा लाडू खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पोटही साफ राहते. आवळ्यामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रियाही सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.


आवळा कँडी


जे लोक कामानिमित्त घरापासून दूर राहतात त्यांना आवळा कँडी हा सोप्पा आणि उत्तम पर्याय आहे. तुम्ही प्रवास करताना कधीही आणि कुठेही आवळा कँडी खाऊ शकता.


आवळा मुरंबा


आवळ्याचा मुरंबा बहुतेक घरांमध्ये उपलब्ध असतो. आवळा रोगप्रतिकारशक्ती खूप सुधारण्यास मदत करतो, त्यामुळे आपला शरीराचा अनेक आजारांपासून बचाव होतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.