Causes of Hiccups : उचकी (Hiccups) आल्यावर आपल्या मनात आधी विचा येतो की, कुणी आपली आठवण तर काढत नाहीय ना? अचानक उचकी येते आणि आपण पाणी पिऊन ही उचकी घालवण्याचा प्रयत्न करतो. उचकीचा आणि कुणी तुमची आठवण काढण्याचा काहीही संबंध नाही. उचकी येण्यामागे अनेक कारणे आहेत. कधी घशामध्ये अन्नाचा घास अडकल्यावर तर कधी जास्त तिखट अन्न खाल्यावर उचकी येते. ही उचकी थांबवण्यासाठी आपण बहुतेक वेळ पाणी पितो. काही जण उलटे आकडे मोजू लागतात. काहींना वाटत की, आपली कुणी आठवण काढली असेल म्हणून ते मित्रमंडळी आणि कुटुंबियांची नावे घेऊ लागतात. पण उचकी येण्यामागचं खरं कारण काय आहे हे जाणून घ्या.


उचकी येण्याचं नक्की कारण काय?


उचकी ही आपल्या शरीरातील एक प्रक्रिया आहे. शास्त्रज्ञांच्या मते, उचकी थेट श्वासाशी संबंधित आहे. आपल्या पचन किंवा श्वसन प्रणालीमध्ये अडथळा आणि जास्त हालचाल होत असेल तर उचकी सुरू होते. पोट आणि फुफ्फुसे यांच्यामधील डायाफ्राम आणि बरगड्यांचे स्नायूंच्या आकुंचन पावल्यमुळे उचकी येते. सामान्यतः जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा डायाफ्राम खाली खेचले जाते आणि तुम्ही श्वास सोडता तेव्हा मूळ स्थितीत परत येते. डायाफ्राम आकुंचन पावल्यामुळे, फुफ्फुस वेगाने हवा आत खेचू लागतात, ज्यामुळे व्यक्तीला उचकी येते. उचकी येण्याचे आणखी एक कारण पोटाशीदेखील संबंधित आहे. जर तुम्ही जास्त अन्न खाल्ले तर पोट फुगते आणि त्यानंतरही उचकी येते.


उचकी येण्याची काही कारणे



  • जास्त अन्न खाणे 

  • खूप जलद अन्न खाणे

  • चिंताग्रस्त किंवा उत्साही असणे

  • कार्बोनेटेड पेय किंवा अल्कोहोलचे जास्त सेवन

  • ताणतणाव

  • तापमानात अचानक झालेला बदल

  • कँडी किंवा च्युइंगम खाताना जास्त हवा ओढणे


'या' कारणांमुळे देखील उचकी येऊ शकते


उचकी ही शरीरातील खूप सामान्य प्रक्रिया आहे. पण जर उचकी जास्त काळ सुरुच राहिली तर हे मोठ्या समस्येचे कारण ठरू शकते.


1. मज्जातंतूचे नुकसान (नर्व डॅमेज - Nerve Damage)


दीर्घकाळापर्यंत उचकी येणे हा वेगस वेन्स आणि फ्रेनिक वेन्स या नसांना नुकसान पोहोचवल्याचा संकेत असू शकतो. या नसांच्या नुकसानीमुळे तुम्हाला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.


2. सेंट्रल नर्वस सिस्टम डिसऑर्डर (Central Nervous System Disorder)


जेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती ट्यूमर किंवा संसर्गामुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेला हानी पोहोचवते तेव्हाही उचकी येते.


3. चयापचय विकार ( मेटाबॉलिक डिसऑर्डर - Metabolic Disorders) 


जास्त मद्यपान, साखर, किडनीचे आजार हे देखील जास्त वेळ उचकी येण्याची अनेक कारणे असू शकतात.


उचकी कशी थांबवता येईल?


उचकी थांबवण्यासाठी तुम्ही थंड पाणी पिऊ शकता. थंड पाणी डायाफ्रामची जळजळ शांत करते. तसेच उचकी थांबवण्यासाठी तुम्ही तुमचा श्वासही काही काळ रोखून ठेवू शकता.