Corona Virus : आतापर्यंत कोरोना विषाणूचे (Corona Virus) अनेक प्रकार सापडले आहेत. कोरोनाच्या बदलत्या प्रकारांमुळे त्याच्या लक्षणांमध्येही झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. कोरोनाची बहुतेक लक्षणे सामान्य सर्दीसारखीच असतात. मात्र, Omicronची लक्षणे डेल्टापेक्षा खूप वेगळी आहेत. अशा परिस्थितीत लोकांमध्ये आढळणारी लक्षणे कोरोनाची की, सर्दी तापाची याचा संभ्रम कायम आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला सर्दी आणि तापाच्या सामान्य लक्षणांसह बरे वाटत नसेल, तर तुम्ही ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. अशा परिस्थितीत, कोरोनाची सर्व लक्षणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.


जागतिक आरोग्य संघटना (WHO), सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) आणि UKची नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) यांनी कोरोना व्हायरसवर अधिकृत लक्षणांची यादी जारी केली आहे. तीन संस्थांनी कोरोना विषाणूची एकूण 32 लक्षणे नोंदवली आहेत, त्यापैकी तीन लक्षणे अत्यंत गंभीर आहेत.


WHO नुसार कोरोनाची लक्षणे


जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), कोरोनाच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, चव आणि वास कमी होणे आणि थकवा यांचा समावेश होतो. कमी सामान्य लक्षणांमध्ये घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी, अतिसार, त्वचेवर पुरळ, डोळे लाल होणे आणि हात आणि बोटांचा रंग बदलणे यांचा समावेश होतो. त्याची तीन सर्वात गंभीर लक्षणे म्हणजे धाप लागणे, छातीत दुखणे आणि बोलण्यात अडचण किंवा गोंधळ जाणवणे.


NHS नुसार कोरोनाची लक्षणे


यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (NHS) कोरोनाची तीन लक्षणे नोंदवली आहेत. यातील पहिले लक्षण म्हणजे ताप. यासाठी तुम्हाला शरीराचे तापमान मोजण्याची गरज नाही, तुम्ही छाती किंवा पाठीला स्पर्श करून ताप ओळखू शकता. दुसरे लक्षण म्हणजे खोकला, एक तासापेक्षा जास्त आणि दिवसभर सतत खोकला असल्यास ते कोरोनाचे लक्षण असू शकते. तिसरे लक्षण म्हणजे वास किंवा चव नसणे.


CDC नुसार कोरोनाची लक्षणे


सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) म्हणणे आहे की, संसर्ग झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते 14 दिवसांदरम्यान रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांमध्ये रुग्णाला थंडी वाजून ताप येऊ शकतो, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय, थकवा, डोकेदुखी, चव आणि वास कमी होणे, घसा खवखवणे, उलट्या किंवा जुलाब, छाती जड होणे, नाक वाहणे आणि स्नायू दुखणे या समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत, रुग्णाने त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha