Corona And Diabetes : कोरोना व्हायरसचा (Corona Virus) धोका सर्व वयोगटातील लोकांना असतो. परंतु, काही लोकांना कोरोना होण्याची शक्यता अधिक असते. कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हा संसर्ग अधिक धोकादायक आहे. विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांमध्ये संसर्गादरम्यान समस्या वाढत आहेत.


कोरोना निरोगी लोकांना आपल्या विळख्यात ओढत असला, तरी मधुमेही रुग्णांमध्ये त्याची तीव्रता थोडी अधिक आहे. मधुमेहग्रस्त रुग्णांचा रक्तप्रवाह फारसा चांगला नसतो आणि त्यामुळे त्यांना बरे होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.


त्वचेवर पुरळ येणे


कोरोनाच्या सामान्य लक्षणांपूर्वी अनेकांना त्वचेवर पुरळ उठणे, सूज येणे किंवा ऍलर्जी यासारख्या समस्या उद्भवत आहेत. उदाहरणार्थ, ज्यांच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त आहे, अशा कोरोना रुग्णांमध्ये हातापायांच्या नखांवर परिणाम आणि त्वचेवर लाल डाग यांसारखी लक्षणे अधिक आढळून येत आहेत.


कोरडी त्वचा


मधुमेहग्रस्त रुग्णांच्या जखमा भरण्यास वेळ लागतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्वचा खूप कोरडी होते. त्वचेवर सूज, लाल ठिपके, मुरुम येण्याची समस्या वाढते. या सर्व गोष्टी कोरोनामुळे देखील होऊ शकतात. मधुमेह असलेल्या कोरोना रुग्णांनी त्यांच्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी आणि या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष द्यावे.


कोविड न्यूमोनिया


कोरोना रुग्णांमध्ये न्यूमोनिया धोकादायक ठरू शकतो, विशेषत: ज्यांना आधीच मधुमेह देखील आहे. जेव्हा रक्तातील साखर वाढते, तेव्हा श्वसनाच्या समस्या देखील वाढतात आणि त्यामुळे कोरोना अधिक गंभीर स्वरूप धरण करू शकतो. रक्तातील उच्च साखरेमुळे, विषाणू शरीरात सहजपणे पसरतो आणि इतर अवयवांना देखील नुकसान करू लागतो.


ऑक्सिजनची कमतरता


या लाटेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमतरता तितकीशी दिसून येत नाहीय. तरीही मधुमेही रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. अशा परिस्थितीत या रूग्णांमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होण्याचा धोका नेहमीच अधिक असतो. श्वास घेण्यास त्रास होणे आणि छातीत दुखणे यासारखी लक्षणे मधुमेही रुग्णांमध्ये जास्त आढळतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha