Cancer in Children : आपल्या देशामध्ये, कर्करोग (Cancer) हा प्रौढांना होणारा एक रोग आहे असे सर्वसामान्यपणे मानले जाते. फारच कमी लोकांना याची जाणीव आहे की, लहान मुलांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जगभरातच नाही, तर भारतात देखील वाढत आहे. भारतात दर वर्षी 50000 पेक्षा जास्त मुले कर्करोगाने बाधित होतात आणि आता 5 ते 15 वयोगटातील मुलांच्या मृत्युसाठी देखील कर्करोग हे नववे सर्वात सामान्य कारण झाले आहे. त्यामुळे खूप लहान वयात कर्करोग होऊ शकतो हे जाणणे आणि मानणे म्हणजे अर्धे युद्ध जिंकण्यासारखे आहे. याबाबत मुंबईतील एसआरसीसी (SRCC) चिल्ड्रन्स हॉस्पिटल, नारायण हेल्थच्या पेडियाट्रिक हेमेटॉलॉजी ऑन्कॉलॉजी अँड बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. रुचिरा मिश्रा यांनी सविस्तर माहिती दिली.
याबाबत जागरुकता पसरवण्याच्या मुख्य उद्देशाने आमच्या हॉस्पिटलने नुकतेच एक अभियान सुरु केले आहे. "लहान वयात होणारे 80 टक्के कर्करोग बरे होऊ शकतात." गेल्या पाच वर्षांत आमचे हॉस्पिटल सुरु झाल्यापासून आम्ही आमच्या ऑन्कॉलॉजी OPD मध्ये 2700 पेक्षा जास्त जास्त मुलांना तपासले आहे. आणि आमच्या हॉस्पिटलच्या डेटानुसार, या पाच वर्षात आमच्या हॉस्पिटलने उपचार दिलेल्या कर्करोग पीडित मुलांपैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त मुले आता कर्करोगमुक्त झाली आहेत. अनेक उदाहरणे आम्ही पाहिली आहेत आणि त्यातील सूर्या, ईशा, श्रेया आणि पियुष (सर्व नावे बदलली आहेत) यांची या संदर्भातली प्रकरणे विशेष लक्षणीय आहेत, असं डॉ. रुचिरा मिश्रा यांनी सांगितलं.
2 वर्षांच्या सूर्याला आमच्या ओपीडीमध्ये आणण्यात आले, तेव्हा त्याच्या पोटात एक गाठ असल्याचे स्पष्ट जाणवत होते. या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच तक्रार नव्हती. आम्ही पीईटी (PET) स्कॅन, सर्जिकल रिव्ह्यूसहित त्याच्या सर्व तपासण्या केल्या आणि त्यानंतर पुढील दोन दिवसांत इमेज-गाइडेड बायोप्सी आणि बोन मॅरो अॅस्परेशन तसेच बायोप्सी केली. एका आठवड्याभरात आम्ही न्यूरोब्लास्टोमाचे निदान केले होते आणि त्यानुरुप उपचार सुरु करण्यात आले होते. तो अत्यंत अनुभवी मेडिकल स्टाफच्या देखरेखीखाली होता आणि आवश्यक ते सर्व उपचार त्याला मिळत होते. आज, सूर्या त्या भयानक रोगाच्या विळख्यातून यशस्वीरित्या बाहेर पडला आहे.
श्रेया जेव्हा आमच्याकडे आली, तेव्हा ती इविंग सारकोमाने ग्रासली होती. हा एक प्रकारचा ट्यूमर आहे, जो हाडे किंवा मऊ उतकांमधील विशिष्ट प्रकारच्या पेशीपासून तयार होतो. मेगाप्रोस्थेसिस सर्जरी आणि केमोथेरपीनंतर ती आता सर्वसामान्य जीवन जगत आहे आणि आता तर ती नीट (NIIT) परीक्षेची तयारी करत आहे.
पियुष ब्लड कॅन्सरचा रुग्ण होता आणि अवघ्या तिसर्या वर्षी त्याला या रोगाचे निदान झाले होते. आज पियुष 8 वर्षांचा आहे आणि शाळेत चांगली कामगिरी करत डॉक्टर होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. 5 वर्षांच्या ईशाला बायलॅटरल विल्म्स ट्यूमर झाला होता पण वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे ती देखील या भयानक रोगातून बचावली आहे.
या सर्व यशस्वी परिणामांमध्ये आमच्या निदर्शनास आलेली सामान्य बाब म्हणजे, लवकर निदान होणे आणि वेळेवर उपचार मिळणे. पण, लहान मुलांमध्ये कर्करोगाचे लवकर निदान होणे म्हणजे काय? हे समजण्यासाठी आपण लहान वयात होणार्या कर्करोगाचे विविध प्रकार आणि त्यांची लक्षणे जाणून घेतली पाहिजेत.
Lung Cancer : फुफ्फुसाचा कर्करोग : लक्षणे, निदान आणि उपचार; जाणून घ्या सर्वकाही
लहान मुलांमध्ये होणार्या कर्करोगांचे प्रकार
लहान वयात होणारा सर्वात सामान्य कर्करोग म्हणजे ल्युकेमिया, बोन मॅरो आणि रक्ताचा कर्करोग. लहान मुलांतील कर्करोगांपैकी सुमारे 28 टक्के याप्रकारचे कर्करोग असतात.
लहान मुलांमध्ये आढळून येणारे अन्य 4 सामान्य कर्करोगाचे प्रकार याप्रमाणे आहेत:
ब्रेन ट्यूमर : लहान मुलांत आढळणारा दुसर्या क्रमांकाचा सामान्य कर्करोग म्हणजे ब्रेनट्यूमर, जो 20 टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणांत आढळतो.
लिम्फोमा : लिम्फोमा किंवा लिम्फ नोड्स / ग्रंथींमध्ये होणारा कर्करोग हा आणखी एक लहान मुलांत आढळणारा कॅन्सरचा प्रकार आहे.
न्यूरोब्लास्टोमा : हा सर्वात सामान्य असा कर्करोगाचा प्रकार आहे, जो 5 वर्षाखालील मुलांमध्ये पोटातील गाठीच्या रुपात दिसतो.
विल्म्स ट्यूमर : विल्म्स ट्यूमर किंवा नेफ्रोब्लास्टोमा मूत्रपिंडातून उद्भवतो आणि एरवी अगदी सामान्य दिसणार्या मुलांमध्ये पोटातील गाठीच्या रुपात आढळून येतो.
लहान मुलांमधील कर्करोगाची प्रारंभिक चिन्हे आणि लक्षणे:
• सतत आणि कारण न समजता वजन कमी होणे
• डोकेदुखी आणि उलट्या
• सांध्यांमध्ये वाढलेली सूज किंवा वेदना आणि लंगडणे
• ओटीपोटात, मानेत किंवा इतरत्र गाठ असणे
• डोळे पांढरे दिसणे किंवा दृष्टीविषयक समस्या
• संसर्ग नसतानाही पुन्हा पुन्हा ताप येणे
• खूप जास्त जखमा होणे
• लक्षात येण्यासारखा निस्तेजपणा किंवा थकवा
जर तुमच्या मुलात किंवा तुमच्या महितीतील इतर कोणत्याही मुलात उपचार केल्यानंतरही यापैकी कोणतीही लक्षणे दिसली, तर काहीही हालचाल न करता वेळ वाया घालवू नका. नेहमी लक्षात ठेवा की, लवकर निदान आणि वेळेवर उपचार मिळाल्यास मूल संपूर्णपणे कर्करोगमुक्त होऊ शकते आणि त्या मुलाला त्याच्या मूळ क्षमतेनुसार जगण्याची संधी मिळते. त्यामुळे, जागरुकता पसरवा, कारण मनमोकळे हास्य आणि निरोगी भविष्यासाठी जागरुकता हे आपल्याकडचे मोठे शस्त्र आहे.
डॉ. रुचिरा मिश्रा-वरिष्ठ सल्लागार
पेडियाट्रिक हेमेटॉलॉजी ऑन्कॉलॉजी अँड बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन
एसआरसीसी (SRCC) चिल्ड्रन्स हॉस्पिटल, नारायण हेल्थ, मुंबई, भारत द्वारा संचालित
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.