Lung Cancer : तुम्हाला खोकला, आवाजात कर्कशपणा जाणवणे किंवा छातीत दुखत आहे का? मग, आपण सावध असणे आवश्यक आहे कारण ते फुफ्फुसाच्या कर्करोगाचे देखील लक्षण असू शकते. या लेखात आम्ही तुम्हाला फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) म्हणजे नेमके काय, त्याचे निदान (Diagnosis) आणि उपचार (Treatment) याबाबत जागरुक करणार आहोत. लक्षात ठेवा की कोणत्याही कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळीच उपचार करणे महत्त्वाचे ठरते.
फुफ्फुसाचा कर्करोग हा जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. सध्या, फुफ्फुसाच्या कर्करुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जे धूम्रपान करतात त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका अधिकपटीने असतो, तरीही फुफ्फुसाचा कर्करोग धुम्रपान न करणाऱ्या लोकांमध्येही दिसून येतो. या कर्करोगाबाबत अजूनही फारशी जागरुकता नाही आणि त्याभोवती असलेल्या गैरसमजुतींना बळी पडण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे, बहुतेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत आणि वेळेवर निदान करणे अशक्य होते.
लक्षणे कोणती?
फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या व्यक्तीला खोकला, खोकल्यावाटे रक्त येणे, अचानक वजन कमी होणे, छातीत दुखणे, डोकेदुखी, श्वासोच्छवासाचा त्रास, ब्राँकायटिस, न्यूमोनिया, भूक न लागणे, हाडांचे दुखणे यांसारखी लक्षणे दिसून येतील. परंतु जेव्हा कर्करोग वाढतो आणि प्रगत अवस्थेत पोहोचतो तेव्हाच ही चिन्हे दिसतात.
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे टप्पे
पहिल्या टप्प्यात हा कर्करोग फुफ्फुसांमध्ये आढळतो परंतु शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात उपचार केल्याने रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. दुसऱ्या टप्प्यात, लिम्फ नोड्ससह फुफ्फुसांमध्ये हा कर्करोग पसरल्याचे दिसून येतो. स्टेज 3 मध्ये, फुफ्फुसात आणि छातीच्या मध्यभागी लिम्फ नोड्समध्ये कर्करोग असतो. चौथ्या टप्प्यामध्ये, कर्करोग फुफ्फुसात आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. वेळीच निदान फुफ्फुसाच्या कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरु शकते.
फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या निदानाबाबच जाणून घ्या
फुफ्फुसाचा कर्करोग शोधण्यात विविध साधने मदत करतील. अशा प्रकारे, एखाद्याला छातीचा एक्स-रे, पीईटी सीटी, बायोप्सी, आण्विक चाचण्या किंवा सीटी स्कॅनची निवड करण्यास सुचवले जाईल. फुफ्फुसाची कार्यक्षमता चाचणी (स्पायरोमेट्री) देखील डॉक्टरांना फुफ्फुसे किती सक्षम आहेत आणि फुफ्फुस किती वेगाने हवेने भरतात आणि नंतर रिकामे होतात हे मोजण्यास मदत करेल. एकदा फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाले की डॉक्टर तुमच्यासाठी योग्य उपचार पद्धती सुचवतील.
उपचार कसा करतात?
याकरिता शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी निवडण्यास सांगितले जाते. सध्या, अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी आणि कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्यापासून रोखण्यासाठी बहुतेक रुग्णांना टोर्गेटेड थेरपी देखील मोठ्या प्रमाणावर दिली जाते. इम्युनोथेरपीमध्ये देखील स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीला कर्करोगाच्या पेशी ओळखण्यास आणि नष्ट करण्यास मदत करण्यासाठी औषधे समाविष्ट असतात. केवळ डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे योग्य राहिल.
- डॉ सुहास आग्रे, कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.