Altered Sleep Cycles Can Lead to Mental Illnesses : मानवाच्या निरोगी आयुष्यासाठी आहार (Food) आणि झोप (Sleep) यांचा समतोल राखणं आवश्यक आहे. आज 17 मार्च रोजी जागतिक निद्रा दिन (World Sleep Day 2023) साजरा केला जातो. मानवाच्या आयुष्यात झोपेचं महत्त्व सांगण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. मनुष्य त्याच्या आयुष्यातील सुमारे 30 टक्के काळ झोपेत घालवतो. योग्य आहारासोबतच पुरेशी आणि शांत झोप आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. अपुरी झोप अनेक आजारांना आमंत्रण देते. झोपेच्या विकारांमुळे हृदयासंबंधित आजार उद्भवतात. यासोबतच धमनीसंबंधित आजार, मधुमेह, सेरेब्रोव्हस्कुलर आणि कार्डिओमेटाबॉलिक रोग यासारख्या अनेक रोगांचा धोकाही वाढू शकतो. अलिकडील संशोधनात असं दिसून आलं आहे की, दररोज एक तास झोप वाढल्याने हृदयाला पुरवठा करणाऱ्या धमन्यांमधील कॅल्सिफिकेशन 33 टक्के कमी होऊ शकते.


पुरेशी झोप निरोगी आरोग्यासाठी आवश्यक


दररोज पुरेशी झोप घेणं हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण सध्याच्या व्यस्त जीवनात स्पर्धा वाढत असल्याने अनेकांना त्यांची झोप कमी करावी लागते. त्यामुळे अनेक जण उशिरा झोपतात आणि लवकर उठतात. साधारण 20 ते 50 वयोगटातील व्यक्तीसाठी सहा ते आठ तासांची झोप गरजेची आहे. पुरेशी झोप घेतल्याने व्यक्तीला उत्साह येतो आणि त्याचं आरोग्य सुधारते हे संशोधनात सिद्ध झालं आहे. दिवसा जास्त झोप लागणे किंवा तंद्री लागणे हा बर्‍याच लोकांची सामान्य तक्रार असल्याचं दिसून येतं. अशी झोप आपल्या कामाच्या वेळेत अकार्यक्षम बनवते. तसेच अनेकांना निद्रानाशाची समस्याही दिसून येते.


दिवसा जास्त वेळा झोप लागण्याची तसेच निद्रानाशाची काही प्रमुख कारणं खालीलप्रमाणे आहेत.



  • अपुरी झोप किंवा झोप न लागणे

  • ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया किंवा झोपेशी संबंधित श्वासोच्छवासाचे विकार

  • सर्केडियन रिदम डिसऑर्डर किंवा शिफ्ट-वर्क सिंड्रोम

  • नार्कोलेप्सी

  • पायांमध्ये अस्वस्थता जाणवणे

  • औषधोपचार चालू असणे.

  • पार्किन्सन रोग, स्ट्रोक, आघात, संक्रमण इत्यादीसारख्या इतर वैद्यकीय कारणांशी संबंधित असू शकते.


दरम्यान, सध्या बहुतेकांमध्ये स्लीप ॲपनिया आजार दिसून येतो. या आजारात झोपेत अचानक श्वासोच्छवास बंद होतो. श्वासोच्छास काही सेकंदांपासून एक मिनिटांपर्यंत थांबतो आणि पुन्हा सुरळीत होतो. व्यक्तीला अनेकदा हे झोपेत हे कळतंही नाही. स्लीप ॲपनिया असणाऱ्या व्यक्ती अनेकदा झोपेत घोरतात. 


घोरण्याची समस्या


घोरणे हे झोपेच्या विकाराचे प्राथमिक लक्षणं असू शकतं. झोपेत आपण जेव्हा श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा आपली मान आणि डोक्यामधल्या मुलायम टिश्यूंमध्ये कंपनं येतात यामुळे घोरण्याचा आवाज येतो. दरम्यान, पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील झोप तज्ञ आणि ईएनटी सर्जन डॉ. मुरारजी घाडगे यांनी स्लीप ॲपनिया (Obstructive Sleep Apnea) संबंधित माहिती दिली आहे.


स्लीप ॲपनिया संबंधित काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे


काही मुले रात्री घोरतात, लहान मुलांना स्लीप ॲपनिया होतो का?


अडीच ते तीन वर्षापर्यंतच्या वयोगटातील 3 ते 12 टक्के मुले घोरतात. यापैकी बहुतेक मुले निरोगी असतात. पण, यातील काही अंदाजानुसार, सुमारे एक ते तीन टक्के मुलांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया सिंड्रोम (OSAS) असतो. ही स्थिती मुलांच्या शालेय आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या म्हणून ओळखली जाते.


भारतीयांच्या संदर्भात स्लीप ॲपनियाची काही विशिष्ट समस्या आहेत का?


झोपेशी संबंधित आजारांबाबत भारतात जनजागृती कमी आहे. अंडरग्रेजुएट वैद्यकीय प्रशिक्षण झोपेच्या औषधाच्या विशेषतेला पुरेसे महत्त्व देत नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की महामारीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, स्लीप एपनियाचे निदान झालेल्या भारतीय रुग्णांचा बीएमआय पाश्चात्य देशांतील व्यक्तींच्या तुलनेने कमी असतो. त्यामुळे अशा रुग्णांनी OSA चाचणी करणं आवश्यक आहे.


शरीराचे वजन आणि स्लीप ॲपनिया यांचा काय संबंध आहे?


सामान्यत: झोपेचा विकार असलेल्या व्यक्तींना श्वासोच्छवासाचा त्रास होतो. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे की, वजन वाढल्याने स्लीप ॲपनिया (OSA) होण्याची शक्यता असते आणि त्याचप्रमाणे वजन कमी केल्याने OSAशी संबंधित तीव्रता आणि लक्षणे कमी होतात. स्लीप ॲपनियाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांसाठी वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो


अल्कोहोलचा स्लीप ॲपनियावर काय परिणाम होतो?


अल्कोहोलमुळे स्लीप ॲपनियाचा त्रास वाढू शकतो. दारु म्हणजेच अल्कोहोलमुळे झोपेत आपले स्नायू अधिक शिथिल पडतात. यामुळे श्वसननलिका आकुंचन पावते. परिणामी वरच्या वायुमार्गात अडथळा येऊ शकतो. अल्कोहोलमुळे सामान्य व्यक्ती घोरायला लागतो. घोरणाऱ्या व्यक्तीमध्ये OSA ची समस्या असू शकते.


लवकर आणि निरोगी झोपेच्या सवयी



  • झोपण्याची आणि उठण्याची वेळ नियमित ठेवा.

  • झोपण्याच्या चार तास आधी नियमित व्यायाम करा.

  • झोपण्यापूर्वी शरीर आणि मन शांत होण्यास मदत होईल, असं कार्य करा. 

  • बेडरुमचे वातावरण शांत आणि तापमान आरामदायक ठेवा.


झोपण्यापूर्वी 'हे' करणं टाळा



  • कमीत कमी सहा तासांसाठी कॅफिन टाळा.

  • किमान चार तास निकोटीन आणि अल्कोहोल

  • किमान एक तास मोबाईल, टीव्ही यांपासून दूर राहा.

  • डुलकी घेतल्यास ती फक्त 20 ते 40 मिनिटांच्या दरम्यान असावी.


Disclaimer : या लेखात नमूद केलेले दावे फक्त सूचना आणि माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sleepless Man : ... अन् कायमचीच झोप उडाली; 61 वर्ष झोपलाच नाही 'हा' व्यक्ती, नक्की असं झालं तरी काय?