Easiest Way To Control Weight : सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनामध्ये अनेकांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. यामुळे लठ्ठपणा (Obesity) आणि त्यासंबंधित आजारांना आमंत्रण मिळतं. वाढत्या वजनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह यासंह इतर आजारांचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहणं फार गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. काही जण व्यायाम करुन घाम गाळतात, तर काही जण डाएटिंगवर लक्ष केंद्रीत करतात. पण तुम्हाला याहून सोप्या उपायाबद्दल माहित नसेल. या साध्या उपायामुळे तुम्ही सहज तुमचं वजन नियंत्रित करु शकता. हा उपाय कोणता ते वाचा. 


झोपेचा तुमच्या वजनावर फार मोठा परिणाम होतो. नियमित आणि पुरेशी झोप यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहतं. हो हे खरं आहे. वजन नियंत्रित करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे योग्य प्रमाणात झोप.


झोपेमुळे वजन होईल नियंत्रित



  • पुरेशी झोप घेतल्याने तुमचं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. हा सोपा पण प्रभावी उपाय आहे.

  • दररोज सुमारे 7 ते 8 तास झोपं घेणं आवश्यक आहे.

  • तुम्ही कितीही व्यस्त असाल तरी झोपेकडे दुर्लक्ष करू नका. किमान सहा तास किंवा त्याहून अधिक झोप शरीरासाठी आवश्यक आहे.

  • नऊ तासांपेक्षा अधिक झोप चांगली नाही. योग्य पुरेशी झोप घेतल्याने तुमची पचनक्षमता सुरळीत राहते.

  • सुर्योदयानंतर झोपून राहू नका.

  • जेवल्यानंतर लगेचच झोपू नका. झोपण्याआधी किमान दोन तास काहीही खाणं टाळा.


अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याच्या शरीरात भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन बिघडतं. त्यामुळे झोपेच्या कमतरतेमुळे भूक वाढते किंवा कमी होते. यासोबतच छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, मूड खराब होणे यासारख्या समस्या होऊ शकतात.


संशोधनानुसार, पुरेशी न झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत दररोज पूर्ण झोप घेणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणाचा धोका 55 टक्क्यांनी कमी असतो. ध्यानामुळेही वजन नियंत्रणातही मदत होते. यामागचं कारण ध्यान केल्याने मन शांत होतं आणि त्यामुळे शरीरात नकारात्मक हार्मोन्सचा स्राव वाढत नाही, ज्यामुळे तुम्ही सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते.


Disclaimer : या लेखात नमूद केलेले दावे फक्त सूचना आणि माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.