Health Tips : आजकाल तरूणाईमध्ये चहापेक्षा कॉफीचे (Coffee) प्रमाण वाढले आहे. कामाचा ताण हलका करण्यासाठी, फ्रेश वाटण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी अनेकजण कॉफीचा पर्याय निवडतात. असे असले तरी मात्र, कॉफीचे प्रमाण कमी केले तर ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरते. डॉक्टर किंवा आरोग्य तज्ज्ञ देखील कमी कॉफी पिण्याचा अनेकदा सल्ला देतात. कमी प्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने हृदयविकार टाळता येतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते तसेच, अल्झायमर, कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचाव करता येतो. मात्र, कॉफी पिण्याच्या वेळेची काळजी घेणे गरजेचे आहे. 


कॉफीचे तोटे काय आहेत?


बरेचदा अनेक जण सकाळी उठल्याबरोबर त्यांना हातात कॉफीचा मग लागतो. मात्र, सकाळ सकाळ रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते. रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने पाचन समस्या, रक्तातील साखर वाढणे, तणावाची पातळी वाढणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात.


आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सकाळ ही खरंतर चहा किंवा कॉफीसाठी सर्वात वाईट वेळ आहे. कारण यावेळी शरीरात कोर्टिसोलची पातळी आधीच जास्त असते आणि कॉफी पिण्यामुळे तणाव संप्रेरकांची पातळी वाढू शकते. ज्यामुळे सतत तणाव जाणवतो.  


कॉफी पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?


सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिण्याने खरंतर नुकसान होते. यासाठी तुम्ही नाश्तानंतर कॉफी घेतल्यास त्याने तुम्हाला फ्रेश वाटेल. तसेच तुमचा ताणही हलका होईल. यासाठी काहीतरी खाल्ल्यानंतरच कॉफीचे सेवन करावे.   


अपचनाचा वाढता धोका


कॉफी पोटात अॅसिडचे उत्पादन उत्तेजित करू शकते. पोटातील अॅसिडचे उत्पादन वाढल्यामुळे, शरीरातील पचनसंस्थेला गंभीरपणे अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे अपचन, सूज येणे, मळमळ इत्यादी समस्या उद्भवतात.


रक्तातील साखर वाढते 


जर तुम्ही सकाळी सर्वात आधी कॉफी प्यायलात तर तुमच्या रक्तातील साखर वाढवू शकते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर ही चूक करू नका.


मूड स्विंग्स होण्याची समस्या


सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने सतत चिंता जाणवते. किंवा मूड स्विंग्स होतात. तुमची सकाळ जर तुम्हाला प्रसन्न हवी असेल तर यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळा.    


हार्मोन्समध्ये बदल 


रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने लेव्होथायरॉक्सिन (सिंथेटिक थायरॉईड संप्रेरक) च्या शोषणावर परिणाम होतो, ज्यामुळे T4 ते T3 हार्मोन्सवर परिणाम होतो.


तणाव आणि जळजळ होण्याचा धोका


सकाळी रिकाम्या पोटी शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ वाढू शकते. थकवा, त्वचेच्या समस्या, मधुमेह यांसारख्या समस्या उद्भवतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :